धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेचा आखाडा पेटला असुन परंपरागत राजकीय विरोधक व हाडवैरी अशी ओळख असलेल्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी एकमेकांवर टीका केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना अर्धवटराव तर आमदार राणाजगजीतसिंह यांना पावशेरसिंह असे म्हणत एकमेकांवर टीका केली आहे, यानिमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीचे पोस्टर रिलीज झाले असेच म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत ही दोन नावे व पात्र चांगलीच गाजणार आहेत, यावर कार्टून मिम्स जोक्स केले जात आहेत.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्धवटराव अशी टीका केली यावेळी त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वभावाप्रमाणे नाव घेतले नाही, नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, औकात नाही असे म्हणत जनता हुशार आहे त्यांना सगळे कळते असे सांगत टीका केली.अर्धवटराव जे आहेत ते पीक विमा असो की इतर विषयात कोर्टात जात नाहीत, चमकोगिरी करतात अशी टीका आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली.
त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रसिद्धी पत्रक काढीत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा पावशेरसिंह असा उल्लेख केला. तुझी कुवत काय आहे हे लोकसभेच्या एका पराभवानंतर जिल्ह्याला दिसुन आले. दुसर्याला बोलण्या अगोदर आपण आत्मपरीक्षण करा.पाच वर्षापुर्वी आपण कोणाचे होता, आज कोणाचे आहात व भविष्यात अजुन कोणाचे व्हाल याची खात्री नसणार्यांनी मला बोलु नये असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांना लगावला.
आमदारांनी थेट नाव न घेता टीका करताना कच खाल्ली तर खासदारानी थेट बॅटिंग केली.