डॉ आर डी शेंडगे याला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई
धाराशिव – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे याला धाराशिव पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी डॉ शेंडगे यांना परराज्यातून अटक करण्यात आली.
डॉ शेंडगे सापडत नसल्यास त्यांना सीआरपीसी कलम 82 व 83 अंतर्गत फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के एम प्रसन्ना यांनी दिले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत शेंडगे यांना अटक केली.12 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास गेली 16 महिन्यापासून डॉ शेंडगे फरार होते.
चुकीची वैद्यकीय सेवा लुटीतील व विविध योजनाच्या नावाने शासनाचे लाखो रुपये लुटणाऱ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आरोपी डॉ आर डी शेंडगे आहेत. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले असे चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेंडगे यांची अटकपूर्व जामीन 2 वेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने तर 2 वेळेस औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.