सुटका, अंतरीम जामीन मंजुर – डॉ आर डी शेंडगे यांना दिलासा, खेळी यशस्वी
धाराशिव – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यात उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणात सकाळी अटक व सायंकाळी सुटका अश्या नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रकरणात डॉ शेंडगे यांची कायदेशीर खेळी अखेर यशस्वी ठरली त्यांना उमरगा कोर्टाने अंतरीम जामीन मंजुर केला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी डॉ शेंडगे यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात तपास पुर्ण झाला आहे तसेच संबंधित लोकांचे जबाब झाले होते त्यामुळे आरोपीचे वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रे, युक्तीवाद व इतर बाबींमुळे अंतरीम जामीन मिळाला. या प्रकरणात सहआरोपी बनसोडे यांना 5 महिने जेलची हवा खावी लागली होती मात्र तपास पूर्ण झाल्यावर डॉ शेंडगे हे पोलिसांना सापडल्याने त्यांना कोर्टातुन दिलासा मिळाला, त्यांची ही कायदेशीर खेळी यशस्वी ठरली.
डॉ शेंडगे सापडत नसल्यास त्यांना सीआरपीसी कलम 82 व 83 अंतर्गत फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के एम प्रसन्ना यांनी दिले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत शेंडगे यांना अटक केली.12 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास गेली 16 महिन्यापासून डॉ शेंडगे फरार होते.
चुकीची वैद्यकीय सेवा लुटीतील व विविध योजनाच्या नावाने शासनाचे लाखो रुपये लुटणाऱ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी डॉ आर डी शेंडगे आहेत. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले असे चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
शेंडगे यांची अटकपूर्व जामीन 2 वेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने तर 2 वेळेस औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता मात्र त्यांना अखेर अटक व्हावेच लागले त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला, उमरगा कोर्टाने अंतरीम जामीन मंजुर केला.