तुळजाभवानी मंदिरातील नित्योपचार आणि पूजाविधी इतर नियमावलीचे संहितिकरण व्हावे : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
मुंबई – समय सारथी
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पूजा विधी आणि नियमावली याबाबतची पुरातन परंपरा आहे. यासाठी पूजा विधी करण्यासाठी काही कुटुंबीयांचा परंपरागत सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व नित्य उपचार पूजाविधी आणि मंदिर परिसरातील नियमावली याबाबत जिल्हा प्रशासनाने संहीतिकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश आज विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले.
धाराशिव जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज एका बैठकीसाठी विधान भवनात त्यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, तुळजा भवानी मंदिरातील अनेक परंपरा आणि पूजा विधी प्रक्रिया यांची नियमित स्वरूपात माहिती मंदिराच्या वेबसाईटवर देणे आवश्यक आहे. तसेच यांचे सहिंतीकरण केल्यामुळे विविध पूजा, विविध विधी तसेच विविध कार्यक्रम याबाबत नियमितीकरण होईल तसेच याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करणार असलेबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.