धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील लचपुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत 2 हजार रुपयांची लाच घेताना 2 पोलिस शिपाई व एका खासगी व्यक्तीस अटक केली आहे. कारवाई न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली. वाशी पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई तानाजी त्रिंबक तांबे, रणजित अनिल कासारे व खासगी व्यक्ती पवन राजेंद्र हिंगमिरे अशी आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर किरकोळ कारवाई करण्यासाठी मी बिट अंमलदार यांना सांगितले होते त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाच मागणी केली. सर्व आरोपीना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी म्हणून नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, सापळा पर्यवेक्षण अधिकारी – सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक यांनी काम पाहिले.सापळा पथकात पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.