धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथील उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर आधारित लिहिलेल्या “डिव्हाईन जस्टीस” या आत्मकथेचे इंग्रजी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन प्रसिद्ध अध्यात्मिक,गुरु आर्ट ऑफ लिव्हिंगचे,श्री.श्री.रविशंकर गुरुजी यांच्या हस्ते झाले.
सकारात्मक शैलीने अनेक पुस्तके लिहिणारे,प्रेरक लेखक,श्री.दत्ता जोशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे अल्पावधीतच मराठीच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांनी तर दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन देशाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, पद्मश्री अण्णा हजारे यांनी केले होते.
ज्ञान प्रबोधिनी केंद्राच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, विचारवंत डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी सदरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.तर अमेरिकास्थित डॅा.सुखमणी रॉय व डॉ.बा.आं.विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रातील डॉ.रमेश चौगुले यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले आहे.
उच्च शिक्षित असूनही उमाकांत मिटकर हे 2002 पासून सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत.सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर न्यायीक सदस्य म्हणून काम करतात.या कामाची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनिसेफचा व राज्यस्तरावरील 59 पुरस्कारांनी गौरविले आहे.याच कामाचा जीवनपट लेखकाने या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.
मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या ‘विशालाक्षी’ मंडपम् येथे हा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी पुस्तकाचे नायक उमाकांत मिटकर,लेखक,श्री.दत्ता जोशी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे मराठवाडा स्तरावर काम करणारे योगसाधक,डॅा.जितेंद्र कानडे,शिक्षक नेते,पतसंस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत मिटकर उपस्थित होते.