लोकअदालतीचे यश – 15 कोटी 59 लाख रकमेच्या प्रकरणाचा निपटारा, दोघांचे संसार पुन्हा जुळले – प्रलंबित 3701 प्रकरणे निकाली
धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी संपूर्ण उस्मानाबाद जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. उस्मानाबाद मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ठिक १०.३० वाजता प्रत्यक्ष लोक अदालतीच्या कामकाजाची सुरवात झाली. या लोक अदालतीमध्ये पॅनल क्र. ०१ वर आर. एस. गुप्ता, पॅनल प्रमुख यांच्या न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरण क्रमांक ३४/२०२१ या ज्योती विरुध्द Godigit Insurance Company या प्रकरणामध्ये तडजोडीने रुपये ३२ लाख मध्ये हे प्रकरण मिटले. “या प्रकरणातील अर्जदार महिला ही वयोवृध्द असल्यामुळे अंजू एस. शेंडे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद व पॅनल प्रमुख आर. एस. गुप्ता हे पहिल्या मजल्यावरून खाली येवून या वृध्द महिलेस रुपये ३२ लखाचा धनादेश सुपूर्द केला” हे या लोक अदालतीचे खास आकर्षण ठरले. या प्रकरणामध्ये अर्जदारांच्या वतीने विधीज्ञ एम. बी. माढेकर तर विमा कंपनीच्या वतीने अजित दानवे व एस. पी. दानवे यांनी काम पाहिले. तसेच मोटार अपघात प्रकरण क्रमांक १०३/२०२३ मध्ये रुपये १लाख ६० हजार मोटार अपघात प्रकरण क्रमांक ११९ / २०२३ मध्ये रुपये ९ लाख व मोटार अपघात प्रकरण क्रमांक १९/२०२३ मध्ये १०,००,०००/- इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. ही तीन प्रकरणे ही साधारणपणे दाखल केल्यापासून सहा महिन्याच्या आत निकाली काढण्यात या लोक अदालतीमुळे शक्य झाले.
या लोकअदालतीचे वैशिष्टये म्हणजे …
या लोकअदालतीमध्ये २ वैवाहीक प्रकरणांमध्ये यशस्वी रित्या तडजोड होवून २०२१ पासून पती व पत्नी विभक्त राहत असलेल्या प्रकरणांमध्ये आज त्यांचा मध्ये समेट घडवून दोन्ही प्रकरणांतील महिलांना सासरी नांदावयास पाठविण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हयात मोठ्या संख्येने प्रलंबित एकुण ५७ हजार १९४ व दावापुर्व एकुण २४ हजार ९६९ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत एकुण १ हजार ३५१ व दावापुर्व एकुण २ हजार ३५० प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रलंबीत दिवाणी स्वरूपाची (७८६), मोटार अपघात / कामगार नुकसान भरपाई प्रलंबीत प्रकरणे (५९), भू-संपादन प्रलंबीत प्रकरणे (१३), फौजदारी तडजोडपात्र स्वरूपाची प्रलंबीत (१८), वैवाहिक संबंधीची प्रलंबीत (१३), धनादेशाची प्रलंबीत (१५५), बँकेची प्रलंबीत (८३), बँकेची वादपुर्व प्रकरणे (१८१), नगरपालिका व ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टीचे वादपुर्व प्रकरणे (२८०५), ग्राहक तक्रार निवारण आयोगाची (०७) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. तसेच गुन्हा कबुलीची (२३०) प्रकरणांमध्ये आरोपींनी गुन्हायाची कबुली दिली. मोटार अपघात / कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील पक्षकारांना रूपये २ कोटी ८६ लाख ५८ हजार नुकसान भरपाई देणेबाबत तडजोड झाली.
सदर लोकअदालतीमध्ये धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये ३ कोटी ८० लाख ९२ हजार ९२४ वसूली करून देण्यात आली. भू-संपादन प्रकरणांमध्ये रूपये ३ लाख ८० हजार ९५० रक्कमेची तडजोड झालेली आहे. प्रलंबीत दिवाणी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणांत रक्कम रुपये ७३ लाख ३२ हजार ९५५, फौजदारी तडजोडपात्र स्वरूपाची प्रलंबीत प्रकरणांमध्ये रु.११लाख, बँकेच्या प्रलंबीत प्रकरणांमध्ये रुपये २ कोटी १२ लाख २६ हजार११९, बँकेच्या वादपुर्व प्रकरणांमध्ये रक्कम रुपये २ कोटी ३३ लाख १७ हजार २७३ नगर पालिका व ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टीच्या प्रकरणांमध्ये रक्कम रुपये ६९ लाख ९९ हजार १९२ व गुन्हा कबुलीची प्रकरणांमध्ये रक्कम रुपये ८५ हजार ८०० दंड वसुल करण्यात आला. आज झालेल्या लोक अदालतीमध्ये रुपये १५ कोटी ५९ लाख १० हजार १८० इतक्या रक्कमेची प्रकरणे निकाली काढण्यात आली असे सचिव न्यायाधीश वसंत यादव यांनी कळविले