सावंतांच्या मनात काय ? एकच चर्चा व तर्कवितर्क – महायुतीच्या मेळाव्यात सावंतांचे नेतृत्व
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महायुतीच्या मेळाव्यात तुफान फटकेबाजी करीत सहकारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांचे कान टोचत सल्ला दिला तर विरोधक यांच्यावर खरमरीत टीका केली. सावंत यांच्या वक्तव्याने राजकीय पंडित सुद्धा चक्रावले असुन सर्वांना संभ्रमात टाकले आहे. धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत परजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नेत्यांनी लुडबुड करू नये असे सांगत त्यांना साथ देणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचे कान टोचले. एकाच कार्यक्रमात सावंत यांनी सहकारी व विरोधक यांची हवा काढून घेतली. सावंत यांच्या मनात काय ? याचीच चर्चा असुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र सावंत यांच्या भाषणाने महायुतीत उत्साह व आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसले.
मंत्री तानाजीराव सावंत हे नेहमी सुचक रोखठोक बोलतात त्यामुळे त्यांच्या राजकीय वक्तव्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, हे उभ्या महाराष्ट्राने भाजप शिवसेना सत्ता परिवर्तनवेळी अनुभवले आहे. सावंत नेहमी म्हणत होते सत्ता परिवर्तन लवकरच काही महिन्यात होणार आणि ते त्यांनी अनपेक्षितपणे घडवून दाखविले. सत्ता परिवर्तनाची सुरुवात त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेतून करीत राज्यात समेट घडवीला व महत्वाची जबाबदारी पुर्ण केली हे सर्वश्रुत आहे. आता सावंत यांनी परजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व त्याला साथ देणाऱ्याला टार्गेट केले आहे त्यामुळे अनेक नेत्यांनी धसका घेतला आहे.
धाराशिव लोकसभा उमेदवारीचा चक्रव्युह फोडण्याचा प्रयत्न एक अभिमन्यू पॉवर दाखवीत करीत असुन इतर पक्षातील आयात नेत्याला उमेदवारी देऊन नवा गडी, नवा राज बसविण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरु आहे, त्याला काही जणांची साथ आहे. काही समीकरणे घालुन स्वतःचे आमदारकीचे स्थान बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्या संभाव्य प्रवेशाला व उमेदवारीला विरोधही तितकाच आहे.
राणा दादा ऐका थोडं… महत्वाचा विषय आहे. धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत इथे व्यासपिठावर तमाम नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते बसलेली आहेत, आम्ही सक्षमपणे उमेदवारीचा निर्णय घेऊ. आम्हाला बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा विभागातून येऊन आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका. कानाला लागलेले 100 असतील, आम्ही त्यांचे ऐकून घेणार नाही, इथले नेते ठरवतील. बाहेरच्यांनी या फंदात पडू नये.
आपण आमदार म्हणून निवडून आलेलो आहोत मात्र आपण 2024 ला आमदार म्हणून निवडून येऊ का ? याची काळजी त्यांनी करावी असे सांगत सज्जड दम देत सावंत यांनी इशारा दिला. त्यानंतर व्यासपिठावर असलेल्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह सगळ्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले व तर्कवितर्कना सुरुवात झाली. सावंत यांनी विषय परजिल्हा, विभाग असा फिरवीत जिल्ह्यात आणून सोडला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातून कोणीतरी यायचे व आम्हाला शिकवायचे हे मी ऐकून घेणार नाही. इतर बाहेरच्या नेत्यांनी जिल्ह्यात उमेदवारीच्या फंदात पडू नये, आमच्या जिल्ह्यात काय अपेक्षा आहे ते सांगा आम्ही ती अपेक्षा पुर्ण करू हे मी वचन देतो असे मंत्री सावंत म्हणाले.
कानाला लागलेल्यानी थोडं शांत घेऊन राहावे, कारण निवडणुकीचे दिवस आहेत म्हणून शांत आहे नाहीतर माझा स्वभाव सर्वांना महिती आहे मी कुठे स्फ़ोट करुन फटाका वाजवील हे कळणार सुद्धा नाही असे म्हणत चुळबुळ व लुडबुड करणाऱ्या नेत्यांना सल्ला मंत्री सावंत यांनी त्यांच्या शैलीत दिला.
धाराशिव जिल्ह्याच्या उमेदवारी बरोबरच विकासात इतर जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी व नेत्यांनी लुडबुड करु नये, आपली कुवत व औकात किती,आपण नेमक काय करतो, आपले मूल्य काय आहे ते पाहून आत्मचिंतन करावे इतकी माफक अपेक्षा आहे, त्यांनी दुसऱ्याच्या जिल्ह्यात ढवळाढवळ करू नये असे सावंत म्हणाले.
महायुतीचा मेळावा धाराशिव येथे संपन्न झाला यावेळी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यासह सर्व पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थितीत होते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले व खरात गट, स्वाभिमान, रयत क्रांती, भीम सेना, प्रहार जनशक्ती पार्टी, शिवसंग्राम असे 14 पक्ष हे सध्या महायुतीमध्ये आहेत.