निलंबन आदेश – तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टेसह लेखापाल बोर्डे व पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई
घोटाळे भोवले, आमदार सुरेश धस यांचा दणका तर दैनिक समय सारथीचा पाठपुरावा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत विविध घोटाळे व त्यानंतर दाखल झालेले गुन्ह्यातील बहुचर्चित तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, लेखापाल सुरज बोर्डे व प्रशांत पवार यांच्यावर एकत्रीत शिस्तभंगाची कारवाईची शिफारस तर बोर्डे व पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असुन त्याबाबतचे आदेश नगर परिषद प्रशासनाचे संचालक तथा आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांनी काढले आहेत. धाराशिव नगर परिषद बँक खाते व बाउन्स झालेले चेक याची माहिती लपविणे व अपुरी माहिती देणे भोवले आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर परिषदेतील अनेक प्रकरणे विधीमंडळात लावून धरली त्याचा पाठपुरावा दैनिक समय सारथी वृत्तपत्राने केला होता त्यानंतर यलगट्टे यांच्यावर भंगारचोरी, खोटी माहिती देणे, फसवणूकीसह इतर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.आमदार धस यांचा दणका भारी पडताना दिसत आहे.
बोर्डे व पवार यांचे निलंबन केले आहेत तर यलगट्टे यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. यलगट्टे, बोर्डे व पवार या तिघांवर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1969 चे नियम 12(2) नुसार एकत्रीत शिस्तभंग कारवाई करावी अशी शिफारस कुलकर्णी यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना केली आहे.