धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समोर आले असुन त्याच्या कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर भावी खासदार असलेल्या पोस्ट टाकल्या आहेत. धनंजय सावंत यांच्या उमेदवारीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते बैठका सुद्धा घेत आहेत. धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, बांधकाम सभापती असुन ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत शिवाय दांडगा जनसंपर्क व सर्वपक्षीय नेत्यांशी जवळीक आहे.
तेरखेडा येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात धनंजय सावंत यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला शिवाय कार्यकर्ते यांनी भावी खासदार धनंजय सावंत यांचा विजय असो अश्या घोषणा दिल्या. त्यानंतर धनंजय सावंत यांनी त्याच्या भाषणात म्हणाले की मी अजुन तरी कोणाकडे माझ्या मनातील लोकसभा लढवायची इच्छा कोणाकडे व्यक्त केली नाही पण निश्चित युवकांचे जे प्रेम आहे ते वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहचेल, असे मला वाटते, घडल तर घडलं. मी प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे वागावतो, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे असे सावंत म्हणाले.
राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री तानाजीराव सावंत यांची भुमिका महत्वाची राहिली आहे, ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे राहिली आहे शिवाय मंत्री सावंत यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. त्यातच त्यांचे पुतणे हे आता इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांत नवंचैतन्य पसरले असुन त्यांनी भुम परंडा, वाशी या भागात आतापासुनच कामाला सुरुवात केली आहे.
शिवजल क्रांती, भैरवनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुका याच्या माध्यमातुन धनंजय सावंत यांचा जनसंपर्क तळागाळातील कार्यकर्त्यात आहे.