धनादेश अनादर – खलील सय्यद यांना शिक्षा व 2 लाख 80 हजार व्याजासह देण्याचे न्यायालयाचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपी खलील सैफ सय्यद यांना दोन महिने तुरूंगवास व धनादेशाची रक्कम 2 लाख 80 हजार रूपये व्याजासह परत देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधिश (वरीष्ठ स्तर) यांनी दिले आहेत.खलील सय्यद हे काँग्रेसचे धाराशिव येथील माजी नगरसेवक आहेत.
या खटल्याची फिर्यादीचे वकील अॅड.बी.के. मोरे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी हरिदास केशवराव पवार यांची 2 लाख 80 हजार रुपये रक्म. खलील सैफ सय्यद यांच्याकडून येणे होती. सदरील रकमेसाठी पवार हे खलील सय्यद यांच्याकडे वारंवार मागणी करीत होते. तेव्हा सय्यद यांनी बँक ऑफ इंडिया धाराशिव शाखेचा 2 लाख 80 हजार रकमेचा धनादेश हरिदास पवार यांना दिला होता. खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश वटला नाही. धनादेशाचा अनादर झाल्यामुळे हरिदास पवार यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथ दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) यांच्याकडे फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणात फिर्यादी व आरोपीच्या बाजूने साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व फिर्यादीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी सय्यद यांना दोन महिने साधी तुरूंगवासाची शिक्षा व धनादेशावरील रक्कम 2 लाख 80 हजार रूपये 9 टक्के व्याजासह देण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड.बी.के. मोरे (वडगाव सि.) यांनी बाजू मांडली.