धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कायदा सुव्यवस्थेसह नागरिकांच्या चांगल्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प केला असुन सिद्धा या अक्यूपंचर थेरपीच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. पोलीस अधीक्षक कुलकर्णी हे स्वतः सकाळी 1 तास या शिबिरात सहभागी होत रुग्ण तपासणी व मार्गदर्शन करीत आहेत. पोलीसिंग व समाजसेवा करीत असताना ते स्वतः फिल्डवर जातात व उपक्रमात सहभागी होत
गुन्हेगार नव्हे तर त्याच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आन्यासाठी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पहाट उपक्रम सुरु केला त्याची न्यायालयाने सुद्धा दखल घेत गुन्हेगार यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक यांचा सेंद्रीय शेती व बाजारपेठ,झाडे लावुन पर्यावरण संवर्धन, पर्यावरण पुरक गणेशोत्सव यासह अनेक उपक्रम हे पोलीस विभागासह राज्याला पथदर्शी असे ठरले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यासह अनेक अधिकाऱ्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे.
पहाट उपक्रमाने प्रेरित होऊन अनेक पारधी समाजातील बांधवांनी गुन्हेगारी कायमची सोडून कुठेतरी मोलमजुरी आणि कष्ट करून जगण्याचा मार्ग निवडला आहे. काही जणांनी चप्पल बुटचे दुकान तर वीट भट्टीवर काम सुरु केले आहे. दिवाळी सणानिमीत्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी या विशेष उपक्रमादरम्यान पोलीस दलाकडुन 500 गरीब कुटुंबांना फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच जिवनावश्यक वस्तुंचे भेट स्वरूपात वाटप सपत्नीक करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढावे यासाठी वृक्षारोपण चळवळ सुरु करुन वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम हाती घेतली, शाळा, महाविद्यालय यासह अधिकारी यांना एकत्र करीत कुलकर्णी यांनी लाखों झाडे लावली व त्याचे संवर्धन केले. ते स्वतः सकाळी उठून झाडे लावतात त्याच्या या वृक्ष व निसर्ग प्रेमामुळे पोलीस अधीक्षक परिसर व त्यांचे निवासस्थान परिसर विविध प्रजातीच्या झाडांनी बहरून गेला आहे.
कुलकर्णी यांच्या विविध उपक्रमामुळे ते समाज व मन मत परिवर्तन करीत असुन त्यांचे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर होणार आहेत. लहान मुलांना बालवयातच वृक्ष, निसर्ग, पर्यावरण याबाबत जबाबदारीची जाणीव व महत्व पटत आहे त्यामुळे बालवयात त्यांच्यावर संस्कार होत आहेत.कुलकर्णी हे सहज लोकात मिसळतात त्यामुळे त्याचा फायदा सामाजिक विषय, समस्या यासह इतर माहिती मिळण्यात होते, त्यांच्या उपक्रमाना सहकारी अधिकारी यांची मोलाची मदत मिळत आहे.