धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील 2017 मधील बहुचर्चित यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात 16 आरोपीना कोर्टाने अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर केला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात अनेक जण हे माजी नगरसेवक आहेत.
बाळासाहेब विश्वनाथ शिंदे,अजित कदम उर्फ परमेश्वर,दयानंद शिवाजी हिबारे,स्वाती कमलाकर कदम, अनिता सज्जनराव साळुंके, विद्या दिलीपराव गंगणे,गणेश किसनराव कदम, महंताबाई किशोर साठे, मंजुषा दिलीपराव मगर, शशीकला शहाजी वाघमारे, रेखा विजय कदम, जयश्री विजय कंदले, अश्विनी विशाल रोचकरी, श्रीकृष्ण वसंतराव सूर्यवंशी, विनोद नागनाथ पलंगे व बाळासाहेब भाऊराव डोंगरे या 16 जणांनी कोर्टात जामिनीसाठी अर्ज केला होता त्यांना न्यायाधीश गुप्ता यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला.
तुळजापूर नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाने शारदीय नवरात्र उत्सव काळात भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी दीड कोटी रुपयांचे यात्रा कर अनुदान देण्यात आले होते मात्र भाविकांना सुविधा न देता लाटल्याप्रकरणी 28 मार्च 2017 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये 32 आरोपींच्या विरोधात राजाभाऊ माने यांच्या फिर्यादीवरून कलम 420,409,406,465,467,468,471,477 व 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राज तिलक रोशन यांनी याचा तपास केला त्यानंतर ते बदलून गेल्यावर हे प्रकरण शांत झाले.
यात्रा अनुदान घोटाळ्यात 16 आरोपींना अटक करण्यात आले होते तर 16 आरोपींना उच्च न्यायालयाने अटक करण्यापूर्वी 48 तास अगोदर नोटीस देने बंधनकारक केले होते त्यानुसार पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्यावर या सर्वजणांनी अटकपूर्व जामिनीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर केले.
तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष रामचंद्र इंगळे, प्रताप कदम,अविनाश राऊत,अनिल शेरखाने, वैजनाथ शेटे,जयराम माने,बापू पारडे,दत्तात्रय गवळी,नागनाथ गवळी, संजय शिंदे,अमर नाईक,नारायण गवळी,संभाजी देवकर यांना अटक केली होती.