धाराशिव – समय सारथी
लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहत असुन भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात लोकसभा जागेवरून रस्सीखेच सुरु आहे. सत्तापरिवर्तन पुर्वी धाराशिव लोकसभा जागा ही शिवसेनेच्या कोट्यात होती त्यामुळे शिवसेनाचा शिंदे गट हा यावर आपलाच दावा सांगत आहे. आज एका कार्यक्रमात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उमरगा लोहारा येथील आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उल्लेख आमचे भावी खासदार असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती मात्र पालकमंत्री सावंत यांची चौगुले यांना पसंती असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आगामी काळात गुरु शिष्यात राजकीय चुरस वाढणार आहे.
एरव्ही कार्यक्रम संपला की कमी वेळ थांबणारे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आज पुर्ण दिवस हा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या सोबत घालवला हे विशेष.. त्यातच पालकमंत्री डॉ सावंत यांनी त्यांचा भावी खासदार उल्लेख केला.
मागील काही वर्षांपासुन मंत्री सावंत हे जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकरची भुमिका बजावत आहेत, ओमराजे निंबाळकर यांना खासदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता सावंत यांनी चौगुले यांना पसंती दिल्याने रवींद्र गायकवाड यांचा मार्ग खडतर असणार आहे.
माजी खासदार रवींद्र गायकवाड याचे ते वक्तव्य
मी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गटाचा संभाव्य उमेदवार आहे. मी त्यावेळीही कायम नॉट रिचेबल होतो व आजही नॉट रिचेबल आहे. मी कायम नॉट रिचेबल असतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे मला सांगायचे फोन ठेवा मात्र फोन ठेवत नव्हतो. फोन ठेवल्याने सगळी कामे होतात असे नाही, ज्याचे काम असते तो माझा ड्राइवर, सोबतचा पदाधिकारी यांना फोन करायचा व त्याचे काम एसएमएस आल्यावर व्हायचे. काही जणांनी चुकीची माहिती दिल्याने त्यावेळी तिकीट नाकारले त्यावेळी काय मानसिकता असेल मात्र मी बाळासाहेब यांचे विचार मानत असल्याने शिवसेना सोडली नाही. माझ्या घरातील सगळे काँग्रेसमध्ये असताना मी सेनेत गेलो.
कोण आहेत आमदार ज्ञानराज चौगुले…
2009 पासुन सलग तीन वेळेस आमदार असुन त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत. 2009 ते आजपर्यंत ते आमदार असुन त्यापूर्वी उमरगा येथे रवींद्र गायकवाड हे 2004 मध्ये आमदार होते त्यांनी केवळ 2,553 मतांनी बसवराज पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर त्यांनी आमदारकीचा वारसा चौगुले यांना देत खासदारकीचा मार्ग स्वीकारला. गुरु शिष्याचे त्यांचे नाते सर्वश्रुत आहे, सत्ता परिवर्तन वेळी आमदार चौगुले हे प्रथम शिंदे यांच्या सोबत गेले व त्यानंतर त्यांनी त्यांचे राजकीय गुरु गायकवाड यांनाही शिंदे गटात आणले.
मतदार संघ – उमरगा लोहारा
2019 निवडणुक स्तिथी – चौगुले विजयी – 25,586 मतांनी
ज्ञानराज चौगुले – शिवसेना – 86,773
दिलीप भालेराव – काँग्रेस – 61,187
2014 निवडणुक स्तिथी – चौगुले विजयी – 20,442 मतांनी
ज्ञानराज चौगुले – शिवसेना – 65,178
किसनराव कांबळे – काँग्रेस – 44,736
2009 निवडणुक स्तिथी – चौगुले विजयी – 10,332 मतांनी
ज्ञानराज चौगुले – शिवसेना – 70,706
बाबुराव गायकवाड – काँग्रेस – 60,474