कळंब – समय सारथी, अमर चोंदे
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असुन धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहिफळ येथे रोहन राजेंद्र भातलवंडे या 19 वर्षाच्या तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे.शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मी मराठा समाजासाठी माझे बलिदान देत आहे तरी सरकारला जाग यावी. एक मराठा लाख मराठा असे लिहीत आत्महत्या केली.
रोहन राजेंद्र भातलवंडे हा सुशिक्षित तरुण होता त्याचे 10 वी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे.नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही, गावात दुध डेअरीचा व्यवसाय सुरू केला. दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता.
दुधाचे दर कमी-जास्त होत होता.या व्यवसायात नफा कमी तोटा अधीक होत आहे हे लक्षात आले. आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला.कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही जर आरक्षण असते तर कुठंतरी संधी मिळाली असती. तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता.
आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी दहिफळ येथे ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती त्यात तो सहभागी झाला होता. एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.तर युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत.
येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी फिर्याद दाखल केली असून घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार प्रकाश चाफेकर, हेडकॉन्स्टेबल सुर्यजीत कदम, तंटामुक्ती अध्यक्ष तात्या भातलवंडे , पोलिस पाटील मनेश गोरे, सरपंच चरणेश्वर पाटील ,एपी आय जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.