जेलवारी – सहायक नगर रचनाकार केंद्रे यांचे दीड लाख लाचेचे प्रकरण
नगररचनाकार देशपांडे यांना मुख्य आरोपी करा – धूरगुडे यांचा कोर्टात अर्ज, आज सुनावणी
धाराशिव – समय सारथी
सहायक नगर रचनाकार मयुरेश केंद्रे यांना दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे केंद्रे यांची रवानगी धाराशिव जेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान फिर्यादी महेंद्र धूरगुडे यांनी या प्रकरणात कोर्टात अर्ज दाखल केला असुन नगररचनाकार देशपांडे यांना सुद्धा यात आरोपी करावे अशी मागणी केली आहे त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.
धुरगुडे यांनी ऍड अजित खोत यांच्या मार्फत कोर्टात अर्ज दिला असून त्यात देशपांडे यांनी कसे पैसे सांगितले हे नमूद केले आहे तसेच त्यांना आरोपी करावे अशी मागणी केली आहे. केंद्रे यांच्या जामीन अर्जावर 4 एप्रिल रोजी आज सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे फिर्यादी धुरगुडे यांनी सांगितले तसेच केंद्रे व देशपांडे यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना केंद्रे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली होती.सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धूरगुडे यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. देशपांडे यांनी सुद्धा लाच मागितली असा आरोप अर्जात केला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विशाल डोके,सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य चालक दत्तात्रय करडे यांनी काम पहिले.