जामीन नाकारला – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांचा अंतरीम जामीन रद्द
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा फसवणूकीच्या गुन्ह्यातील अटक पुर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड यांनी दिली. यलगट्टे यांना या प्रकरणात यापूर्वी दिलेला अंतरीम जामीन रद्द केला आहे त्यामुळे यलगट्टे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.
नगर परिषदेने तक्रार देताना यलगट्टे यांना आरोपी केले आहे मात्र ज्या जागेत हा परवाना दिला गेला ते अर्जदार जागा मालक पुजा व प्रसाद पाटील यांना मात्र अभय दिले आहे. संचिका गायब, खोटी कागदपत्रे व शासनाची फसवणूक केली असेल तर या सर्वांना आरोपी करणे अपेक्षित होते मात्र तक्रार देताना पाटील यांना झुकते माप दिल्याचा आरोप नगर परिषदेवर होत आहे त्यामुळे पाटील यांना सहआरोपी करावे अशी मागणी होत आहे.
धाराशिव नगर परिषद हद्दीमध्ये पोलिस मुख्यालयासमोरील सर्व्हे नंबर 145/5 मध्ये छत्रपती हौसिंग सोसायटीमधील मंजुर रेखाकनातील प्रसाद रंगनाथ पाटील व पुजा प्रसाद पाटील हे खुल्या जागेत आणि अंतर्गत रस्त्यावर बांधकाम करीत असल्याची तक्रार उदय निंबाळकर यांनी केली होती. त्यात बांधकाम परवान्याची संचिका उपलब्ध नसल्याचे प्रथम नगर परिषदेने कळविले मात्र नंतर पाटील यांना पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी परवाना सादर केला. संचिका सापडत नसल्याचा लेखी अहवाल मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी संगनमत करुन ऑफलाईन परवानगी दिल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.
संचिका उपलब्ध होत नसल्याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 51 नुसार कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त सतीश शिवणे यांनी आदेशीत केले होते त्यानुसार कलम 420, 465,484 अन्वये 16 मार्च रोजी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.