सरकारी कार्यक्रमात यापुढे ‘बुके बॅन’ पुस्तकांचा वापर करा : जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी काढले परिपत्रक
धाराशिव – समय सारथी
विविध योजनांच्या निमित्ताने नियमितपणे सरकारी कार्यक्रम जिल्हाभर होत असतात यामध्ये स्वागतासाठी बुके वापरले जात असून सोबत प्लास्टिक कॅरिबॅगचा वापरही वाढल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सर्वच विभागांसाठी परिपत्रक काढले आहे . त्यात यापुढे बुके न वापरता विचारांना खतपाणी देणाऱ्या पुस्तकांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वेगवेगळ्या विभागांकडून आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अधिकारी व लाभार्थी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बुकेंचा वापर करण्यात येतो. मात्र बुकेसोबतच प्लास्टिक कॅरिबॅगचाही वापर वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
एकीकडे सामान्य नागरिक , विक्रेते यांच्यावर प्लास्टिक मुक्तीसाठी कारवाया केल्या जातात . दुसरीकडे सरकारी कार्यक्रमात त्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी गुरुवारी याबाबत परिपत्रकच काढले आहे.
सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांना हे परिपत्रक पाठवून यापुढे कोणत्याही शासकीय कार्यक्रमात बुके , प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहेत. त्याऐवजी महापुरुष , वैज्ञानिक,ज्ञान प्रबोधनपर,ऐतिहासिक पुस्तके देण्याच्या सूचना आहेत अथवा पर्यावरणपूरक वृक्षरोपेही देता येतील असे डॉ ओम्बासे यांनी सूचित केले आहे .