जामीन मंजुर – केंद्रे यांचे दीड लाख लाचेचे प्रकरण – देशपांडे यांना तात्पुरता दिलासा, उच्च न्यायालयात होणार अपील
धाराशिव – समय सारथी
सहायक नगर रचनाकार मयुरेश केंद्रे यांना दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोर्टाने जामीन मंजुर केला असुन त्यांना 50-50 हजार रुपयांचे असे 1 लाखांचे ऐपत प्रमाणपत्र देऊन जामीन मंजुर केला आहे. जामीनाची अट पुर्ण केल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका होणार आहे तूर्तास त्यांचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे. तर फिर्यादी महेंद्र धूरगुडे यांनी नगररचनाकार देशपांडे यांना आरोपी करण्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला असल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे दरम्यान या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धूरगुडे यांनी सांगितले आहे.
धुरगुडे यांनी ऍड अजित खोत यांच्या मार्फत कोर्टात अर्ज दिला असून त्यात देशपांडे यांनी कसे पैसे सांगितले हे नमूद केले आहे तसेच त्यांना आरोपी करावे अशी मागणी केली होती मात्र ती अधिकार क्षेत्रात नसल्याने फेटाळली आहे. आरोपी केंद्रे यांच्या वतीने ऍड सुधाकर मुंडे यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने ऍड शरद जाधवर यांनी बाजू मांडली. यावेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी तपासाबाबत कोर्टाला माहिती दिली.
6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले होते त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना केंद्रे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली होती.सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धूरगुडे यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.