लाखोंची भंगारचोरी अनं यलगट्टे यांची हेराफेरी – आपचे ऍड अजित खोत यांची तक्रार, अडचणी वाढणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या लाखो रुपयांच्या भंगारचोरीत तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी कार्यालयीन चौकशी व फिर्याद देताना हेराफेरी केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष ऍड अजित खोत यांनी केला असुन याबाबत तक्रार दिली आहे. यलगट्टे यांना धाराशिव पोलिसांनी अटक केली असुन त्यांना भंगारचोरीच्या गुन्ह्यात आरोपी करुन अटक करावी अशी मागणी खोत यांनी केली आहे तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यलगट्टे यांनी भंगारचोरी प्रकरणात चौकशी करताना अनेकांना अभय दिले. 25 हजार रुपयांची रक्कम भंगारचोरी प्रकरणी भरून घेतली मात्र पोलिसात तक्रार देताना त्यांनी केवळ 13 हजाराचे भंगार चोरी गेल्याचे नमूद केले. जर मग 13 हजाराचे भंगार गेले असेल तर 25 हजार कसे भरून घेतले? हा प्रश्न उपस्थित करीत ऍड खोत यांनी या सगळ्या प्रकारावर संशय व्यक्त करीत यलगट्टे यांना आरोपी करावे व अटक करावी अशी मागणी केली आहे.
आपचे ऍड अजित खोत म्हणाले की, धाराशिव नगरपरिषद मधील राजरोजपणे 85 लाखाची भंगारचोरी प्रकरणांमध्ये पोलिसांनी कुठलीच कार्यवाही न केल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली, ती याचिका प्रलंबित असून धाराशिवच्या जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तू भंगारात विकल्या आहेत. पोलीस अधीक्षक व आनंदनगर पोलीस स्टेशन यांना आम आदमी पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे परंतु त्या फिर्यादीवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे यलगट्टे यांना आरोपी करावे अशी मागणी खोत यांनी केली आहे.