धाराशिव – समय सारथी
केंद्र सरकारने यापुढे कोणत्याही वाहनचालकांकडून अपघात झाल्यास त्या चालक (ड्रायव्हर) ला ७ लाख रुपये दंड व १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय मनमानीपणे व एकाएकी घेतला असून ड्रायव्हर यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. या तुघलकी निर्णयामुळे यापुढे कोणीही वाहन चालविण्यास धजावणार नाही त्यामुळे तो निर्णय रद्द करावा या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाच्या वतीने 2 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघाचे जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ट्रक, बस, मोटरसायकल, रिक्षा, टमटम यांच्या गाडीवरील ड्रायव्हर संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे. सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा व घातक असून या ड्रायव्हरला अडचणीत आणणारा ठरणार आहे. त्यामुळे तो निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व चालक खॉंजा नगर येथील एम.के. फंक्शन हॉल येथून मोर्चा काढणार येणार आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष पठाण यांनी केले आहे