जेलमध्ये रवानगी – भंगारचोरीत यलगट्टे यांना अटक करण्याची कोर्टाची परवानगी, अडचणीत वाढ
लाखोंचे भंगार गायब – सीसीटीव्ही, पुरावे नष्ट, आपचे ऍड अजित खोत यांच्या प्रयत्नांना यश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या लाखो रुपयांच्या भंगारचोरीत तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यासाठी कोर्टाने आनंद नगर पोलिसांना परवानगी दिली आहे. दरम्यान यलगट्टे यांना बांधकाम परवाना फसवणूक प्रकरणात कोर्टाने जामीन मंजुर केला आहे मात्र त्यांनी जामीन न दिल्याने त्यांची रवानगी धाराशिव जेलमध्ये करण्यात आली आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यात जामीन मंजुर करताच पोलिसांनी लगेच यलगट्टे यांना भंगारचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी मागितली, ती कोर्टाने मान्य केली. यलगट्टे यांना उद्या पोलीस जेलमधून ताब्यात घेऊन अटक करणार आहेत.
नगर परिषदेच्या आवरातून लाखो रुपयांची भंगारचोरी झाल्यावर केवळ 13 हजारांचे भंगार चोरीला गेले असे पोलीस तक्रारीत नमूद केले व 25 हजार रुपयांची रक्कम संबंधित व्यक्तीकडून त्या बदल्यात नगर परिषदेच्या खात्यात यलगट्टे यांनी लेखी आदेश करुन भरून घेतले, याच प्रकारमुळे यलगट्टे अडचणीत आले आहेत. नगर परिषदेच्या आवारात झालेल्या भंगारचोरीचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले. डेड स्टॉक, आवक जावक रजिस्टरसह महत्वाचे कागदपत्रे व पुरावे सुद्धा नष्ट करण्यात आल्याची माहिती असुन या भंगारचोरीच्या कटात अनेक जण सहभागी आहेत त्यामुळे याची व्याप्ती वाढू शकते. तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
आपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा मराठवाडा अध्यक्ष ऍड अजित खोत यांनी या भंगारचोरी घोटाळ्याबाबत चौकशी करावी अशी पोलीसांकडे तक्रार केली होती त्याला आता यश आले आहे. लाखोंची भंगारचोरी अनं यलगट्टे यांची हेराफेरी या मथळ्याखाली दैनिक समय सारथी वृत्तपत्राने भंगारचोरीचे प्रकरण उघड केले होते.
धाराशिव नगर परिषदेमध्ये कचरा विलगीकरणाची 5 ते 6 टनाची मशीन सुद्धा गायब आहे तर 46 कचरा गाड्यांचे टमटम भंगारमध्ये होते तेही गायब आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त केलेले भंगार 23 व 24 जुलै 2022 रोजी सुट्टीच्या दिवशी गायब करण्यात आले, या प्रकरणाची चर्चा झाल्यावर 11 दिवसांनी नगर परिषदेचे कर्मचारी विलास गोरे यांच्यावर गुन्हा नोंद केला व इतरांना अभय दिल्याचा आरोप ऍड खोत यांनी केला.
ऍड अजित खोत म्हणाले की, धाराशिव नगरपरिषदमध्ये राजरोजपणे 85 लाखाची भंगारचोरी करण्यात आली. यलगट्टे यांनी भंगारचोरी प्रकरणात चौकशी करताना अनेकांना अभय दिले. 25 हजार रुपयांची रक्कम भंगारचोरी प्रकरणी भरून घेतली मात्र पोलिसात तक्रार देताना त्यांनी केवळ 13 हजाराचे भंगार चोरी गेल्याचे नमूद केले. जर मग 13 हजाराचे भंगार गेले असेल तर 25 हजार कसे भरून घेतले ? हा प्रश्न उपस्थित करीत ऍड खोत यांनी या सगळ्या प्रकारावर संशय व्यक्त करीत तपास करावा अशी मागणी केली होती.