दलालाच्या डायरीत धाराशिव जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांची नावे – गर्भलिंग तपासणी व गर्भपात रॅकेटनंतर अनेक जण रडारवर
धाराशिव – समय सारथी
गर्भलिंग तपासणी व गर्भपात रॅकेटचा भांडाफोड धाराशिव पोलीस व आरोग्य विभागाने केला असुन त्यात पुन्हा एकदा कर्नाटकातील गुलबर्गा येथील कनेक्शन उघड झाले आहे. गर्भलिंग तपासणी व गर्भपात रॅकेट मधील एका दलाल पकडण्यात यश आले असुन त्याकडे एक डायरी सापडली आहे त्यात अनेक खळबळजनक बाबी आहेत.
विशेष म्हणजे हे रॅकेट मोठे असून यामध्ये उस्मानाबाद शहरातील बड्या हस्तींसह आरोग्य विभागातील काही कर्मचारी सामील झाले असल्याचा खळबळजनक खुलासा गर्भ धारणापूर्व व प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अर्थात पीसीएनडीटी जिल्हा समितीचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे आता अनेकजण रडारवर आले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ खुणे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक तथा गर्भ धारणापूर्व व प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध जिल्हा समितीचे सचिव राजाभाऊ गलांडे, कायदेशीर सल्लागार ॲड रेणुका शेटे, डॉ आळंगेकर आदी उपस्थित होते.
डॉ खुने म्हणाले की, स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे जिल्ह्यात प्रमाण वाढले असून अनेक महिला यासाठी दलाल म्हणून काम करत आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील काहीजणांचा सहभाग आहे.
दलालाकडून नोटा, मोबाईल व इतर काही चिठ्ठ्या असे साहित्य हस्तगत केले आहे. या मोबाईल व चिठ्ठीत डॉ गुरुराज कुलकर्णी यांच्यासह इतर डॉक्टर व संबंधितांची नावे पुढे आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये उस्मानाबाद शहरातील नामांकित मंडळीचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. या दलालाने जिल्ह्यामध्ये अनेक सहाय्यक दलाल तयार केले आहेत. या दलालामध्ये महिलांचा मोठा समावेश असून यामध्ये आरोग्य विभागा अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या काही कर्मचारी यांचा मोठा समावेश असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणी उमरगा न्यायालयात कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.