भाडेकराराचा बनाव कोर्टात उघड – 600 रुपये देत महिलांचे शोषण, दलाल व मॅनेजरचा वाटा,जप्त रजिस्टरमधील नावे गुलदस्त्यात
शेरखाने थेट स्कॅनरने पैसे खात्यात घ्यायचा, अनेकांना महिला पुरवल्या ? महिलांना जाळ्यात ओढत वाम मार्गाला लावले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील बहुचर्चित निसर्ग गारवा लॉजवरील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा मुख्य आरोपी नितीन शेरखाने यांचा जामीन न्यायाधीश व्ही जी मोहीते यांनी नाकारला असुन शेरखाने याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. शेरखाने याचा जामीन नाकारताना मा कोर्टाने अनेक निरीक्षणे नोंदविली असुन वेश्या व्यवसाय कसा चालायचा ? पिडीत महिलांना, दलालाला किती पैसे दिले जायचे ? यासह शेरखाने याला वाचवण्यासाठी केलेल्या कागदोपत्री भाडेकराराचा बनाव कोर्टात उघड झाला आहे.
दरम्यान ग्राहकांकडुन आलेले पैसे हा नितीन शेरखाने स्कॅनरवर स्वतःच्या खात्यावर घ्यायचा त्यामुळे या सेक्स रॅकेटची मला माहिती नाही, मी नाही त्यातला हा पवित्रा कोर्टात खोटा ठरला. दलालीचे पैसे बँक खात्यावर घेतल्याने चांगलाच अडचणीत आला असुन आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. शेरखाने याने कोणा कोणाला महिला पुरवल्या व किती महिलांना जाळ्यात ओढत या वाम मार्गाला लावले याचा तपास सुरु आहे.
आरोपी नितीन शेरखाने याने सदरील लॉज 5 लाख रुपये डिपॉझिट व दरमहा 70 हजार रुपये भाड्याने मॅनेजरला दिल्याचे सांगत 20 सप्टेंबर 2022 रोजीचा एक भाडेकरार कोर्टात जामीन मिळवण्यासाठी सादर केला मात्र 5 लाख डिपॉजिट व दरमहा 70 हजार भाड्याची कोणतेही पुरावे व बँक स्टेटमेंट कोर्टात न दिल्याने हा भाडेकरार पुरावा शेरखाने याला अनैतिक कृत्य व अन्य बेकायदेशीर बाबीपासुन वाचवण्यासाठी ढाल म्हणून तयार केल्याचे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदविले आहे.
अनैतिक वेश्या व्यवसायाचे हे प्रकरण गंभीर असुन सामाजिक दृष्टया धोकादायक आहे, जर आरोपीला जामीन दिला तर तो पिडीत महिला, साक्षीदार व ज्यांना या धंद्याची माहिती आहे त्यांना धमकावेल व पुरावा नष्ट करेल असे कोर्टाने निकालात म्हण्टले आहे. शिवाय शेरखाने याच्या विरोधात प्रथमदर्शी सकृत पुरावा असुन अधिक पोलीस तपास होणे गरजेचे आहे.
निसर्ग गारवा या लॉजवर वेश्या व्यवसाय केला जायचा यात प्रत्येक ग्राहकाकडुन 1 हजार 500 रुपये घेतले जायचे त्यातील 600 रुपये हे पिडीत महिलांना दिले जायचे व उर्वरित 900 रुपये हे मॅनेजरमार्फत शेरखाने याला जायचे. मॅनेजर दिलीप रामदास अडसूळे याला दरमहा 12 हजार रुपये देऊन नौकरीला ठेवले गेले होते शिवाय ग्राहक शोधून आणणारा रिक्षाचालक दलाल बालाजी चंद्रकांत गवळी याला प्रति ग्राहक 300 रुपये दिले जायचे असे समोर आले आहे. अश्या रीतीने शेरखाने याला प्रति ग्राहक 600 रुपये मिळत असत हे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या टीममधील पोलीस हवालदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार साईनाथ आशमोड, योगेश कोळी, रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार भोसले, अरब यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केल्याने याचा भांडाफोड झाला व शेरखाने याचा चेहरा जगासमोर आला.
पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रेड केली यात त्यावेळी महिला सापडून आल्या, रोख रक्कम,नोंदीचे रजिस्टर सापडले.या गुन्ह्यातील आरोपी नितीन शेरखाने याला धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली त्यानंतर त्याची रवानगी धाराशिव कारागृहात करण्यात आली. पोलिसांना लॉजवरील नोंदीचे रजिस्टर मिळाले असुन त्यात कोण कोण लाभार्थी आहे याचा तपास सुरु असुन ती नावे तूर्तास गुलदस्त्यात आहेत.
पिडीत महिलांची सुटका करुन भादंवि कलम 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 अन्वये शेरखाने, मॅनेजर व दलाल याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.