मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या करणार नुकसानीची पाहणी – धाराशिवचा दौरा तयार
धाराशिव – समय सारथी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी, धारूर येथील अवकाळी पाऊस व गारपीट येथील नुकसानीचे विदारक स्थित समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्याची महसूल, कृषी व पोलीस प्रशासनाकडून तयारी सुरु केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे उद्या दुपारी 12.10 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथून हेलिकॉप्टरने निघतील व दुपारी 1.30 वाजता तुळजापूर हेलिपॅडवर येतील. त्यानंतर 1.50 वाजता धारूर येथे व 2.40 वाजता वाडीबामणी या गावात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करतील आणि 3.10 वाजता मुंबईकडे रवाना होतील.
धाराशिव जिल्ह्यातील 71 गावांना अवकाळी व गारपिटीचा फटका बसला असुन पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांच नुकसान झाल्याचे समोर आले आहे, आज दुसऱ्या दिवशीही महसूल व कृषी विभागाचे पंचनामे सुरु आहेत. पावसाचा 71 गावांना फटका बसला असुन 38 घरांची पडझड झाली आहे तर 3 नागरिक जखमी झाले आहेत. काल दिवसभरात केलेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांच नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताना पाठविला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
धाराशिव व उमरगा या 2 तालुक्यात 16 मिमीच्या पुढे पाऊस पडला तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झाले. 20 मोठी व 900 कोंबडी पिल्ले दगावली आहेत. जिरायत क्षेत्र 1 हजार 74 हेक्टर, बागायत क्षेत्र 835 हेक्टर व फळबागा 662 हेक्टर नुकसान झाले आहे