व्याप्ती वाढली – अखेर नगर अभियंता केंद्रे यांना सहआरोपी करण्याचे मुख्याधिकारी फड यांचे पत्र
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील 22 मालमत्ताना नियमबाह्य व बेकायदेशीरपणे 8 अ उतारा दिल्याप्रकरणी तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांना सहआरोपी करावे असे लेखी पत्र मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिले आहे. तब्बल सव्वा 2 वर्ष म्हणजे 28 महिन्यानंतर नगर परिषदेने विशेष सभेत घेतलेल्या ठरावाची यनिमित्ताने अंमलबजावणी होत आहे. खुद्द जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत 24 मार्चला पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेच्या हद्दीतील 365/5 मध्ये अनधिकृतपणे पाडण्यात आलेल्या 22 भूखंडाची नोंद 8 ला घेल्याचे प्रकरणी चौकशी सुरु होताच संचिका गायब करण्यात आली होती त्या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह लिपीक राजेंद्रकुमार शिंदे यांच्यावर कलम 197,471,477 अ, 201 प्रमाणे 5 मार्च 23 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र त्यावेळी केंद्रे यांना अभय देण्यात आले.
22 भूखंडाची नोंद घेताना संबंधित नगर अभियंता नवनाथ केंद्रे व लिपीक राजेंद्रकुमार शिंदे यांनी बेटरमेंट व विकास कर शुल्क भरून घेतले नाही तसेच हे प्लॉट आरक्षित होते त्यामुळे नगर परिषदेचे नुकसान झाले. या प्रकरणी गुन्हा नोंद करावा व रक्कम वसुली करावी असा ठराव 21 डिसेंबर 2020 रोजी विशेष सभेत घेण्यात आला होता त्याअनुषंगाने केंद्रे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती मात्र त्यांनी खुलासा दिला नाही व नगर परिषदेनेही काही केले नाही. आता केंद्रे यांना सहआरोपी करावे यासाठी कार्यालय अधीक्षक संजय कुलकर्णी यांना प्राधिकृत केले आहे.
नगर अभियंता केंद्रे यांचे अनेक प्रताप उघड
केंद्रे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी प्रसाद व पुजा पाटील प्रकरणात परवाना दिल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे त्यामुळे त्यातपण केंद्रे यांना आरोपी करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्रे यांची जानेवारी 2020 मध्ये बदली झालेली असतानाही जुलै 2020 मध्ये पाटील यांना केंद्रे यांनी बांधकाम परवाना दिल्याचा आरोप लेखी पत्रात केला आहे.
22 बोगस 8 अ प्रकरणात विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न व हक्कभंग सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार त्यावेळी ही कारवाई करण्यात आली होती.