आत्महत्या प्रकरणात 6 महिन्यांनी अटकपुर्व जामीन – गावोगावी मिरवणुक, जल्लोष – आत्मचिंतनाची गरज
साम,दाम,दंड भेद… सिंघम,सरकार राजच्या सुचक संदेश देणाऱ्या रिल्स व जल्लोषाचा कहर
धाराशिव – समय सारथी
सुरेश भाऊ नाम तो सुना ही होगा.. हा फिल्मी डायलॉग सध्या धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा या भागात गाजत आहे त्याचे कारणही तसेच आहे. भुम येथील 30 वर्षीय फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी सुरेश कांबळे यांना तब्बल 6 महिन्यांनी अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजुर केला, धाराशिव पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरेश भाऊ हे फरार राहण्यात यशस्वी राहिले. त्यांना जामीन मिळताच त्यांच्या समर्थक, चाहत्यांनी गावोंगावी त्यांची टॅक्टरवरून मिरवणूक काढली व जेसीबीने फुलांची उधळण करीत जल्लोष केला गेला. सुरेश भाऊंचा हा नवीन पॅटर्न सध्या धाराशिव जिल्ह्यात गाजला असुन त्याने एक नवीन पायंडा निर्माण केला आहे.
साम, दाम, दंड भेद..सिंघम, सरकार राज, भेटला विठ्ठल अश्या गाण्याच्या सुचक संदेश देणाऱ्या रिल्स व जल्लोषाचे फोटो स्वतः सुरेश कांबळे यांनी सोशल मीडियावर टाकले असुन त्यांचे डिजिटल मार्केटिंग व्हावे यासाठी त्याचे स्पॉन्सर पेड प्रमोशन सुद्धा केले आहे हे विशेष. एखाद्याने आत्महत्या केली त्यामागे कोण याचा अंतीम निर्णय अजुन आला नाही, न्यायादेवता तो करेल मात्र त्यापूर्वी अश्या प्रकारे जल्लोष करणे म्हणजे त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भावनेवर, दुखावर मीठ चोळल्यासारखेच आहे. भाऊंनी मात्र याला एक इव्हेंट बनविला असल्याचे दिसते.
जामीन मिळाल्यावर न्यायालयासह तपास यंत्रणेच्या नाकावर टिच्चून जल्लोष हा दूरगामी सामाजिक परिणाम करणारा ठरू शकतो. जामीन हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतो तो दोषमुक्ती नसतो मात्र जामीन झाल्यावर युद्ध जिंकल्याच्या आवेशात शक्तीप्रदर्शन करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र या पॅटर्नवर टीका होत आहे.
समाजहिताचे हे चिन्ह नसल्याने राजकीय नेतृत्वाना व पोलीस यंत्रणेसह सामाजिक घटकांना आत्मचिंतनची गरज आहे. पोलिसांनी मनावर घेतले तर काही अशक्य नाही मात्र सुरेश भाऊ यांनी साम, दाम दंड नितीने फरार राहून हे शक्य करुन दाखविले.
भुम परंडा व वाशी या भागात सध्या भाऊंची हवा आहे. भुम तालुक्यातील उळुप, सोनगिरी वाकड सांडेसांगवी, सुकटा, भवानवाडी, डुक्करवाडी, पाडोळी, वंजारवाडी यासह अनेक गावात जेसीबीने फुलांची उधळण व डीजे, क्रेन,फटाक्यांची अतिशबाजी, हलग्या वाजवीत जंगी सत्कार करण्यात आले. ना मंत्री, ना खासदार, ना आमदार, ना साखर कारखान्याचा वा बँकेचा चेअरमन हे तर जनतेचे प्रेम असे सांगत भाऊ या प्रेमाने ओलेचिंब झाले आहेत.
सुरेश भाऊ हे सध्या या भागात आदरणीय व्यक्तिमत्व बनले असुन तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, एका तरुणाने हातावर काढलेला त्यांच्या नावाचा टॅटू भाऊ रिल्समध्ये अभिमानाने दाखवीत असुन भेटला विठ्ठल माझा हे पार्शवगीत त्याला जोडले आहे. सुरेश भाऊ यांची थेट विठ्ठलाशी तुलना करण्यात आली आहे.
जिवाभावाच्या या माणसानी मला साथ दिली त्यामुळे माझ्या राजकीय व सामाजिक चळवळीला पाठबळ आले. या पाठबळावरच भल्या भल्याशी दोन हात करतोय, गावाकडच्या माणसामुळे व अश्या सत्काराने काम करण्याची ऊर्जा मिळते अश्या आशयची पोस्ट कांबळे यांनी पोस्ट केली आहे. कांबळे यांनी 2019 मध्ये भुम परंडा मतदार संघात वंचितकडुन विधानसभा लढवीत 27 हजार 939 मते घेतली होती तर त्यांची जय हनुमान ग्रुप व मल्हार आर्मी संघटना आहे.
काही ठिकाणी पोलीसांच्या गराड्यात बंदोबस्तात हा मिरवणूकीचा बडेजाव करण्यात आला. एरव्ही पोलीस सक्रीय असतात मात्र या मिरवणूका कशासाठी, डीजे परवाना यासह अन्य बाबी विचारत थांबविण्याची तसदी घेतली नाही. या मिरवणूक पॅटर्नला पोलीस कसे घेतात हे पाहावे लागेल. दरम्यान सुरेश कांबळे यांना कोर्टाने कोणत्या अटींवर जामीन दिला त्या अटी अद्याप समोर आल्या नाही.
काय होते प्रकरण –
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपीच्या अटकेसह एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई या मागणीसाठी भुम येथील गोलाई चौकात रस्ता रोको करीत निषेध केला त्यावेळी 10 दिवसात आरोपीना अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र तब्बल 6 महिने भाऊ फरार राहण्यात यशस्वी झाले.
आत्महत्या केल्यावर कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती करीत आत्महत्या केली आहे.