एसएस मोबाईल शॉप चोरी उघड – 23 लाखांचे मोबाईल जप्त करीत आरोपीना केली अटक, धाराशिव पोलिसांची धाडसी कारवाई
तुळजापूर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
तुळजापूर शहरातील एस एस मोबाईल शॉप येथे झालेल्या चोरीचा गुन्हा उघड करण्यात धाराशिव पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी जवळपास 23 लाख रुपयांचे 104 मोबाईल जप्त केले असुन यात 2 आरोपीना माळेगाव व मुंबई येथून अटक केली आहे तर 2 आरोपी निष्पन्न झाले असुन ते फरार आहेत. तुळजापूर येथील गुन्हा सोबतच पोलिसांना या आरोपीनी इतर जिल्ह्यात केलेले 4 गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. हैद्राबाद, अकोला, परभणी व लातूर या जिल्ह्यात केलेले गुन्हे उघड झाले आहेत.
तुळजापूर येथे 20 मार्च रोजी चोरट्यानी भरवस्तीतील एस एस हे मोबाईल दुकानाचे शटर फोडून मोबाईल चोरून नेले होते तो गुन्हा आता उघड झाला आहे.
सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोहेकॉ यादव, लाटे, पवार, साळुंके, माळी, शिंदे यांनी ही कामगिरी करीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अकबर खान व मुंबई येथील आबू शाहिद शेख यांना अटक केली तर मालेगाव येथील अतिक अहमद रफिक व इमरान खान हे आरोपी फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.