तुळजाभवानी नवरात्र घटस्थापना मुख्यमंत्री यांच्या हस्ते करावी – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची शिंदेकडे मागणी
तुळजापूर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील घटस्थापना मुख्यमंत्री यांचे हस्ते सुरु करण्याची मागणी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी व गारपीट नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना आमदार पाटील यांनी ही मागणी केली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नगरसेवक आनंद कंदले, तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, गुलचंद व्यवहारे, विक्रमसिंह देशमुख उपस्थित होते.
पंढरपूर देवस्थान येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वारकरी संप्रदायासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी पंढरपुरातील आषाढी एकादशीची विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची प्रथा सुरू केली त्याचप्रमाणे शिंदे यांनी ही प्रथा सुरु करावी अशी मागणी केली आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते शासकीय पूजा होते त्याप्रमाणे आई तुळजाभवानी देवीजींची घटस्थापना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते करण्याची प्रथा आपल्या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार पाटील यांनी केली आहे.
तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव हा देवीच्या मुख्य उत्सव पैकी एक असुन या काळात लाखो भाविक देशभरातून तुळजाभवानी दर्शनासाठी येत असतात. सध्या शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना ही तुळजाभवानी मंदीर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाते. मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुजा केल्यास ते स्वतः या ठिकाणी येतील. त्या निमित्ताने एक महत्व प्राप्त होईल शिवाय तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर शहर येथे अनेक सुविधा व आढावा बैठक, निधी प्राप्त होतील अशी भावना आहे.