5 लाखांची मागणी 90 हजार लाच – धाराशिव लाचलुचपत विभागाची 2 जणांवर कारवाई सुरु
धाराशिव – समय सारथी
5 लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 90 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने 2 जणाविरुद्ध कारवाई केली आहे. परंडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भगवान भरत नाईकवाडे व पोलिस शिपाई सागर वसंतराव कांबळे या दोघाविरुद्ध कारवाई केली आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या लाखो रुपयांचे ट्रॅप होत आहेत.
भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक हे दहशतवादी विरोधी पथक, उस्मानाबाद येथे सन 2019 मध्ये नेमणूकीस असताना त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून त्यामध्ये यातील तक्रारदार व इतरांना आरोपी केले. तसेच त्याच दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील ईतर लोकांविरुद्ध कलम 353, 307 चा गुन्हा दाखल केला. परंतु कलम 353,307 च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते.
14 एप्रिल रोजी नाईकवाडे व कांबळे यांनी तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम 353,307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून 5 लाख रुपये किंवा सेकंड हॅन्ड गाडी अश्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 90 हजार लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रादार यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. या दोघांविरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी हा सापळा रचला. सापळा पथकात पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके यांनी कामगिरी बजावली.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक 1064 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.