अरविंद पतसंस्था घोटाळ्यात गुंतवणुकदारांचे लक्ष, 3 कोटी 50 लाखांची फसवणुक
धाराशिव – समय सारथी
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणी चेअरमन रोहितराज विजय दंडनाईक यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 28 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश किरण बागे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. तब्बल दीड महिन्यापासुन तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु आहे तर संचालक संजय बोंदर यांच्या सुद्धा अटकपुर्व जमिनावर सुनावणी होणार आहे.
वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक व सर्व 16 संचालक फरार आहेत. जिल्हा, उच्च न्यायालयाने जामीन नाकारूनही पोलिस अटक करीत नसल्याने कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वसंतदादा व अरविंद यांच्या डजनभर फरार संचालक पैकी एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. सर्वजण कागदोपत्री फरार आहेत.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणात तत्कालीन व्यवस्थापक दीपक देवकते व संचालक हरिश्चंद्र शेळके यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 6 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अरविंद घोटाळ्यात पोलिसात 10 लाखांचा प्राथमिक गुन्हा नोंद असुन त्यातील 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली आहे मात्र तपासात घोटाळ्याचा आकडा हा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे त्यामुळे काय निर्णय येतो याकडे गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे.
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंद केलेल्या तक्रारदार वाकुरे यांनी यापुर्वी रोहितराज दंडनाईक यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. त्यामुळे एकाच फसवणूकीच्या गुन्ह्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंद होऊ शकत नाहीत त्यामुळे गुन्हा रद्द करावा अशी भुमिका आरोपीचे वकील ऍड मिलींद पाटील यांनी मांडली आहे तर तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या आजवरच्या तपासात फसवणूकीचा आकडा साडे तीन कोटी कोटीच्या पुढे गेल्याचे लेखी दिले आहे.
शिवाय मूळ एफआयआर गुन्ह्यात वाकुरे सोडून अन्य लोकांची तक्रारदार म्हणून नावे आहेत तर गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस चौकशीत अनेक नवीन तक्रारदार समोर आले असुन त्यातील काहीनी कोर्टात शपथपत्र व वकीलपत्र दाखल केले आहे. प्रत्येकाने वेगळा गुन्हा व कोर्टात जायचे का ? अशी बाजु गुंतवणूकदार यांचे वकील ऍड अजित खोत यांनी मांडली आहे. सरकारी वकील शरद जाधवर यात काम पाहत आहेत.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणी चेअरमन तथा मुख्य सुत्रधार आरोपी विजयकुमार उर्फ नाना दंडनाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी नाकारला असुन अनेक महत्वाच्या बाबी व निरीक्षणे आदेशात नोंदविली आहेत. चेअरमन दंडनाईक यांचा बँक घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित करीत पोलीस तपासाची गरज असल्याचे सांगत अटकपुर्व जामीन फेटाळला आहे, त्याच कोर्टात अरविंद पतसंस्थाची सुनावणी होत आहे.