चौकशी समीती हतबल, 7 स्मरणपत्रे देऊनही कागदपत्रे मिळेनात
धाराशिव नगर परिषदेच्या योजनांची चौकशी – रेकॉर्ड सापडेना की गायब ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या विविध योजनाच्या चौकशीसाठी नगर परिषदेने कागदपत्रे न दिल्याने चौकशी पुर्ण होऊ शकली नसल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी समितिने तब्बल 7 वेळेस स्मरणपत्रे देऊनही माहिती उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. नगर परिषदेकडे कागदपत्रे असतील तर ती का दिली जात नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. कागदपत्रे सापडत नसल्याचे नगर परिषदेच्या सुत्राकडून सांगितले जात आहे त्यामुळे कागदपत्रे गहाळ प्रकरणी गुन्हा नोंद होणार का हे पाहावे लागेल.
महाराष्ट्र लेखासंहिता 2011 नियम क्र 62,315,317, 450 मध्ये अनुदान प्राप्त नोंदवही नमुना क्र 26 चा 7 जुलै 2020 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील नमुना, नगर परिषद यांना लागू असलेल्या सर्व योजनाच्या बँक खात्याची यादी व बँक विवरणपत्र, सर्व योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांच्या संचिका व प्रमाणके, बँक ताळमेळ विवरणपत्र, सर्वसाधारण बँक पुस्तक नुमना व बँक खातेनिहाय नोंदवही द्यावी यासाठी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांनी सहा वेळा स्मरणपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहे.
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी लेखी आदेश 8 एप्रिल रोजी 6 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला 10 एप्रिल पासुन चौकशी सुरु करुन 7 दिवसात चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते त्याची मुदत संपली तरी नगर परिषदेने कागदपत्रे दिली नाहीत त्यामुळे चौकशी पुर्ण होऊ शकली नाही.निलंबित मुख्याधिकारी यलगट्टे यांना कोर्टाने भंगारचोरी, फसवणूक, अट्रॉसिटी या सर्व गुन्ह्यात जामीन मंजुर केला असुन ते सध्या धाराशिव कारागृहात आहेत.
यलगट्टे यांच्या काळात महानगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहर मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 व इतर योजनाचे ठेकेदार यांना देण्यात आलेले धनादेश ( चेक ) बँकेमध्ये न वटता परत आले तसेच विविध योजने अंतर्गत नगर परिषदेस प्राप्त झालेले अनुदान हे योजनेत समाविष्ट कामावर खर्च न करता इतर कामावर खर्च करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर वरील मुद्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे.
धाराशिव नगर परिषदेचे विविध बँकात 39 खाते असल्याची माहिती यलगट्टे यांनी दिली मात्र उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केलेल्या तपासणीत धाराशिव नगर परिषदेची 121 खाती असल्याचे उघड झाले. यावरून एकच योजनेचे एकपेक्षा जास्त खाती उघडल्याची शक्यता नाकारता येत नाही. यानिमित्ताने नगरोत्थान योजना चौकशीच्या रडारवर आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असुन त्यात सदस्य म्हणून उमरगा नगर परिषदेचे लेखापाल अंकुश माने, भूमचे लेखापाल विवेकानंद बिराजदार, कळंबचे हिंदुराव जगताप, लोहाऱ्याचे दीपक मुंडे व वाशीचे भागवत पवार यांचा समावेश आहे. या समितीने चौकशी करुन दोषी असल्यास जबाबदारी निश्चित करुन शिफारशीसह अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.