कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील पांगरधरवाडी येथे बोगस काम – सुट्टीच्या दिवशी टाकले मोठंमोठाले दगड
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील जलसंपदा विभागाने कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे पांगरधरवाडी येथील बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी निर्माण गोल्ड स्ट्रक्चर या ठेकेदाराला नोटीस बजावून पाईपलाईनचे काम पुन्हा करण्यास सांगितले असुन दंडात्मक कार्यवाहीचा इशारा दिला आहे.
पांगरदरवाडी पंप हाऊस ते कालवा या दरम्यान 540 मीटर भुमिगत पाईपलाईन टाकली जाणार आहे यासाठी 7 कोटी 16 लाख रुपये निधीची तरतुद केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निर्माण गोल्ड कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले आहे. कृष्णा प्रकल्पतील काम निकृष्ट करीत मोठं मोठे दगड टाकून पाईपलाईन बुजवली होती त्यामुळे आगामी काळात या योजनेचे मोठे नुकसान होणार होते, पांगरधरवाडी येथील ग्रामस्थानी या बोगस कामाचा भांडाफोड केला होता,त्यानंतर हे प्रकरण दैनिक समय. सारथीने लावुन धरले होते.
संबंधित अभियंता प्रत्यक्ष कामावर गेल्यावर ठेकेदार कंपनीने खोदकामातून निघालेले मोठं मोठे दगड पाईप लाईन बुजवण्यासाठी वापरल्याचे निदर्शनास आले. कंपनीचे प्रतिनिधी शिंदे व भाताने यांना काम थांबविण्यास सांगितले, त्यावेळी सॉफ्ट मुरूम अंदाजपत्रकाप्रमाणे वापरण्याचे आश्वासन दिले मात्र अभियंता उपस्थितीत नसताना व सुट्टीवर असताना पुन्हा तोच प्रकार सुरु ठेवला. परस्पर कामे करुन गुणवत्ता ठेवली नाही.
ठेकेदार कंपनीने भरलेले सर्व मोठे दगड, मटेरियल बाहेर काढून नियमानुसार काम क्षेत्रीय अभियंता यांच्या निगराणीखाली सर्व चाचण्या करुन करावे अन्यथा दंडात्मक कार्यवाही प्रास्तावित करण्याचा इशारा दिला आहे.
सत्तेतील एका बड्या दादा नेत्याचा या कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचे बोलले जात असुन कंत्राटदार यांचा यापुर्वी सुद्धा मुजोरपणा व बोगस कामे समोर आली आहेत.