अहवाल सादर – धाराशिव पंचायत समितीत लाखोंचा घोटाळा उघड, गुन्हे नोंद होणार
मजुरांच्या नावे लाखो रुपये लाटले – जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव पंचायत समितीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा लेखी अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे. वृक्षलागवड, सिंचन विहीर व मातोश्री पानंद योजनेत हा अपहार केल्याचे समोर आले असुन बोगस मजुरांच्या नावाने लाखो रुपये एकाच खात्यावर उचलून घोटाळा केला आहे. यात तत्कालीन गटविकास अधिकारी व इतर काही कर्मचारी दोषी आढळून आले असुन त्यांच्यावर खुलासा अंती गुन्हा नोंद केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी दिली. पंचायत समितीच्या विविध योजनाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे त्याचबरोबर शेवगा लागवडसह अन्य चौकशी सुरु आहे.
शोषखड्डे, शेवगा लागवड, मातोश्री पाणंद व घरकुल योजनेतील घोटाळा दैनिक समय सारथीने पुराव्यासह उघड केला होता त्यानंतर या घोटाळ्याची दखल उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी घेत धाराशिव पंचायत समितीच्या सर्व योजनाचे विशेष लेखापरीक्षक करण्याचे आदेश नोव्हेंबर 2022 या महिन्यात दिले होते, तब्बल 5 महिन्यानंतर यातील काही मुद्याची चौकशी झाली असुन अहवाल सादर केला आहे.
शेवगा लागवड, शोषखड्डे, घरकुल, सिंचन विहीर, मातोश्री पानंद शेतरस्ते, वृक्षलागवड, विहीर पुनर्भरण या कामांची 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळातील कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी दिले होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीत जिल्हा परिषदेच्या नरेगा सेलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चकोर, रोहयोचे सहायक लेखाधिकारी डी डी हेडगिरे, श्रीमती चेडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो कार्यक्रम व्यवस्थापक विशाल आवाड हे सदस्य आहेत.