सुट्टया रद्द, जिल्हाधिकारी यांचे आदेश – शनिवार व रविवारी व सोमवारी होणार चौकशी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या विविध योजनाच्या चौकशीसाठी नगर परिषदेने पर्याप्त कागदपत्रे न दिल्याने चौकशी अद्याप पुर्ण होऊ शकली नसल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासह इतर संबंधित कर्मचारी यांची शनिवार, रविवार व सोमवारची सुट्टी रद्द केली आहे. या काळात या कर्मचारी यांनी कागदपत्रे चौकशी समितीला कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यापूर्वी देखील गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी शनिवार व रविवारची सुट्टी रद्द केली होती.
चौकशी समीती हतबल, 7 स्मरणपत्रे देऊनही कागदपत्रे मिळेनात, रेकॉर्ड सापडेना की गायब ? या मथळ्याखाली दैनिक समय सारथीने वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर खळबळ उडाली होती. चौकशी सुरु असुन त्यानंतर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र लेखासंहिता 2011 नियम क्र 62,315,317, 450 मध्ये अनुदान प्राप्त नोंदवही नमुना क्र 26 चा 7 जुलै 2020 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील नमुना, नगर परिषद यांना लागू असलेल्या सर्व योजनाच्या बँक खात्याची यादी व बँक विवरणपत्र, सर्व योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांच्या संचिका व प्रमाणके, बँक ताळमेळ विवरणपत्र, सर्वसाधारण बँक पुस्तक नुमना व बँक खातेनिहाय नोंदवही द्यावी यासाठी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांनी सहा वेळा स्मरणपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले होते.
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कारभाराच्या चौकशीचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी लेखी आदेश 8 एप्रिल रोजी 6 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला 10 एप्रिल पासुन चौकशी सुरु करुन 7 दिवसात चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.
यलगट्टे यांच्या काळात महानगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहर मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 व इतर योजनाचे ठेकेदार यांना देण्यात आलेले धनादेश ( चेक ) बँकेमध्ये न वटता परत आले तसेच विविध योजने अंतर्गत नगर परिषदेस प्राप्त झालेले अनुदान हे योजनेत समाविष्ट कामावर खर्च न करता इतर कामावर खर्च करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर वरील मुद्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे.नगरोत्थान योजना चौकशीच्या रडारवर आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असुन त्यात सदस्य म्हणून उमरगा नगर परिषदेचे लेखापाल अंकुश माने, भूमचे लेखापाल विवेकानंद बिराजदार, कळंबचे हिंदुराव जगताप, लोहाऱ्याचे दीपक मुंडे व वाशीचे भागवत पवार यांचा समावेश आहे, ही समिती आता सुट्टीच्या दिवशी चौकशी पुर्ण करणार आहे.