धाराशिव – समय सारथी
कृष्णा खोऱ्याचे 7 टीएमसी पाणी धाराशिवला देण्यासाठी सौर ऊर्जेचा आधार घेण्यात येणार आहे. पाणी उपसा करण्यासाठी विविध टप्प्यावर लिफ्ट इरीगेशनसाठी 56 मेगावॅट वीज लागणार असुन त्यासाठी सोलर प्रकल्पचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने मेढा विभागाकडे पाठविला आहे. राज्यातील हा दुसरा प्रकल्प असणार असुन सातारा जिल्ह्यातील टेंभी प्रकल्पासाठी सौरऊर्जेचा वापर केला जात आहे, त्याच धर्तीवर आता कृष्णा खोऱ्याच्या पाण्यासाठी सोलर प्रकल्प उभे केले जाणार आहेत.
इंदापूर व जेऊर बोगद्यातून कृष्णाचे पाणी मराठवाड्यात येणार आहे, सीना कोळेगाव प्रकल्पात पाणी आल्यावर तेथून पुढे पाण्याचा उपसा होणार आहे. साकत,हिवरडा,सोनगिरी, ईट, धाराशिव तालुक्यात पाणी येणार आहे. विजेची समस्या मोठी असल्याने सध्या केवळ 8 तासाच वीज मिळते शिवाय लिफ्ट इरीगेशनचे बिल करोडो रुपयात येते त्यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प पर्याय ठरणार आहे.
उपसा सिंचन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात नियमित वीजेची गरज असते त्यामुळे त्यांचे वीज बिल परवडणारे नसते. जलसंपदा विभागाकडे तलावाच्या लाभक्षेत्रात जमीन उपलब्ध आहे, त्या जागेचा उपयोग सौर प्रकल्पासाठी केला जाणार आहे. 1 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 5 ते 6 एकर जागा लागते त्यानुसार प्रकल्प अहवाल तयार करुन प्रस्ताव मेढाकडे पाठविला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे यांनी दिली.