114 जणांना कुणबी प्रमाणपत्र तर 731 कागदपत्रे भाषांतरण बाकी, शोधकार्य सुरु
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात 1 हजार 215 मराठा कुणबी पुरावे असलेली कागदपत्रे सापडली असून त्यापैकी 459 कागदपत्रे शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहेत तर 731 कागदपत्राचे भाषांतर करणे बाकी असुन जिल्हा प्रशासन इतर कागदपत्राची पाहणी करुन शोध घेत आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 41 लाख 49 हजार कागदपत्रे तपासण्यात आली. सर्वाधिक 538 नोंदी धाराशिव तालुक्यात सापडल्या तर तुळजापूरला 320 नोंदी सापडल्या आहेत. जिल्ह्यातील 77 गावात मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवून आतापर्यंत 114 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. 156 जणांनी अर्ज केले असुन 114 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. गावोगावी शिबीर घेण्यात येणार असुन प्रमाणपत्र देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्याचे कुटुंब व वारसाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
भुमी अभिलेख कार्यालयात असलेल्या नमुना नंबर 33 मध्ये घराचे बांधकाम प्रकार, मालक नाव व जातीची नोंद असते तर नमुना 34 मध्ये घरातीलकर्ता पुरुष, त्यांची 15 वर्षाच्या पुढील मुले, जनावरे,साक्षरता, स्थावर मालमत्ता अश्या जनगणना नोंदी आहेत, या नोंदी घ्या 1880 च्या काळातील आहेत.भुमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असलेली 7 लाख 62 हजार 182 कागदपत्रे तपासण्यात आली त्यात 726 कुणबी पुरावे सापडले.
कागदपत्रे ही मोडी, उर्दू भाषेतील असल्याने त्यांचे वाचन करण्यास वेळ लागत असुन अनेक कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी जिल्हा प्रशासनातील संपूर्ण यंत्रणा कागदपत्रे तपासणीसाठी कामाला लावली होती त्यात महसूल, शिक्षण, मुद्रांक,पोलीस, कारागृह, भुमी अभिलेख यासह कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका तपासण्यात आल्या. सर्वाधिक कुणबी नोंदी ह्या शिक्षण विभागाकडे सापडल्या.
जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे अभिलेख शोधण्यासाठी 11 विभागातील 43 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या विवरणपत्रात माहिती संकलित करून करण्यात आली. या विवरणपत्रात सादर केलेली माहिती 1948 ते 1967 पूर्वीच्या कालावधीतील अभिलेखे तपासणी करून तयार करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 1948 पूर्वीचे निजामकालीन महसुली भूमी अभिलेखे शैक्षणिक व जन्म व मृत्यू नोंद वहयांची तपासणी करून समितीपुढे अहवाल सादर करण्यात आला.
इथे सापडल्या मराठा कुणबी नोंदी –
धाराशिव तालुक्यातील कारी,कौडगाव,येडशी,राजुरी, सांजा,अंबेजवळगे, उतमी कायापुर,कसबे तडवळे,आंबेहोळ,खेड,दाऊतपुर,पाडोळी,भिकार सारोळा, सुर्डी या गावात नोंदी सापडल्या आहेत. परंडा तालुक्यातील कुंभेफळ,भांडगाव,लोणी,भुम तालुक्यातील लांजेश्वर,घाटनादूर,देवेंग्रा,बऱ्हाणपुर,रामेश्वर,हाडोंग्री,लोहारा तालुक्यातील माकणी वाशी तालुक्यातील घोडकी,दसमेगाव व सोनेगाव इथे नोंदी सापडल्या आहेत.
उमरगा तालुक्यातील आलूर,उमरगा,कडदोरा,कुन्हाळी, गुंजोटी,डीग्गी,तुगाव,दाबका,बलसूर,मानेगोपाळ,मुरुम, येळी,व्हंताळ,सांगवी, हंद्राळ तर कळंब तालुक्यातील आवाड शिरपूरा,करंजकल्ला,कोथळा, गोविंदपुर,जवळा, बरमाचीवाडी, मलकापूर,वाघोली,शेळगाव,बहुला, बाबाळगाव तुळजापूर तालुक्यातील येवती,सावरगाव काटी,मंगरूळ,काटगाव,गंजेवाडी,चिंचोली,ढेकरी,तीर्थ खु व बुध,दहीटणा,दहीवडी,नांदुरी,बोरनदवाडी,बोरी,यमगरवाडी, सांगवी मार्डी,सिंदफळ,सुरतगाव