वाशी – समय सारथी, शोएब काझी
मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा वाशी येथे पार पडली, सकाळी 11 वाजता होणारी सभा रात्री 7.30 वाजता म्हणजे तब्बल 8 तासानंतर सुरु झाली मात्र त्याचं उत्साह व जोशात मराठा बांधवानी सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली.
24 डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर मी सांगतो काय करायचे ते. 25 डिसेंबरनंतर आपण मुंबईत जाऊन तिथले विमानतळ, शेअर बाजार इमारत, नोटा कसे चपतात, बिस्कीट कंपनी कशी असते, समुद्र कसा असतो, मंत्री कुठे, कसे मंत्रालयात बसतात हे जाऊन पाहू. मुंबई बघायला काय हरकत आहे, आम्हाला फक्त मुंबई बघायची आहे तिथे गेल्यावर आम्ही आरक्षण मागणार नाही फक्त मुंबई पाहायला येऊ असे सांगितले.
अगोदरच्या टप्प्यात सरकारने निर्णय घेतला त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नोंदी सापडल्या आहेत व तिसऱ्या टप्प्यात प्रमाणपत्र गेल्याशिवाय मागे हटणार नाही, मग जीव गेला तरी हरकत नाही मात्र आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. गाव तिथे साखळी उपोषण करा, आतापासून कामाला लागा. रोज गावागावात जाऊन जनजागृती करा असे आवाहन केले. आरक्षण विरोधात भुमिका मांडू नका असे आवाहन त्यांनी सर्व मंत्र्यांना केले.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आरक्षण देतील असा विश्वास आहे मात्र नाही दिले तर आमची मुंबईत व्यवस्था करा, आम्ही भाकरी घऊन येतो, तिथे मुंबईत आल्यावर आम्हाला पाणी सुद्धा पाजू नका. आम्ही सगळं आणतो फक्त आमची तिथे बाकीची व्यवस्था करा. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र राहावा अशी आमची इच्छा आहे. आता माझ्याकडे सव्वा 2 कोटी मराठा लोकांची नोंद झाली आहे मुंबई जायला त्यामुळे सरकारने लवकर ठरवावे असा इशारा दिला.
मराठा समाजसेवक प्रशांत चेंडे व सुरेश कवडे यांच्या हस्ते हार घालुन स्वागत करण्यात आले यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी, आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनगर समाजाच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात जरांगे यांचे काठी व घोंगड देऊन स्वागत करण्यात आले. वाशी येथील सभा संपल्यावर मराठा समाजातील स्वयंसेवकांनी मैदान साफ सफाई केली.
तुमचा सभेचा वेळ 11 वाजताचा होता मात्र उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. प्रत्येक गावात लोक स्वागत करत होते, मी डावलून पुढे जाऊ शकत नाही कारण मी खानदानी मराठा आहे. तुमच्या पुढे नतमस्तक होतो,
इतक्या रात्री एकजुट दाखवली, मराठा एकजुट काय हे वाशी येथे दाखवून दिले. इतक्या रात्री तुम्ही इथे बसलात कारण तुमच्या लेकरांची आरक्षणाची वेदना घेऊन इथे आलात.
70 वर्षांपासुन मराठा समाजने कष्ट करुन लेकरं शिकवली. माय बापाच्या मनात एकच स्वप्न दुःख होते की मला जे कष्ट आले ते माझ्या मुलाला नको म्हणून रात्र दिवस कष्ट केले मात्र आरक्षण घात केला लेकरं हुशार असताना शिक्षण व नौकरीत संधी मिळाली नाही. आता आरक्षण नाही तर कधी नाही म्हणून मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला असुन झुंजायचं असं ठरवलं म्हणून या आंदोलनात उतरला आहे.
ज्या नेत्यांना मोठं केले तोच मराठा समाजाच्या विरोध उतरला आहे. आधी आजा मोठा केला नंतर बाप, मुलगा मोठा केला नंतर नातू अश्या 4 पिढ्या मोठ्या केल्या मात्र आपले काय ? आपले मुलं मात्र ऊस तोडायला पाठवायचे का ? असा सवाल जरांगे यांनी केला.
सरकारने सांगितले 24 डिसेंबर या तारखेपर्यंत आरक्षण देऊ. मराठा कुणबी अश्या 70 वर्ष लपविलेल्या नोंदी सापडत आहेत.70 वर्ष कोणी आरक्षण मिळू दिले नाही ते सांगा. ज्या ज्या वेळी आरक्षण बाबत समित्या गठीत झाल्या त्यावेळी नोंदी नाही म्हणून सांगण्यात आल्या मात्र आता 1805 ते 1967 पर्यंतच्या नोंदी सापडत आहेत आता या नोंदीचा अहवाल दाखल होईल व त्यानंतर कायदा संमत होऊन मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.
आमचे बोर्ड फाडले त्यावेळी आम्ही जर म्हणालो असतो चलो भोकरदन तर मग कसे झाले असते. आम्ही फक्त डोळ्यांनी घर पाहायचे ठरवले असते तर अवघड झाले असते. तु काय आमचा बोर्ड फाडतो तुझ्या बनियान चड्डी सहित फाडतो तुला ऊस तोडायला लावतो असा इशारा दिला.
आपण नेत्यांच्या मुलांना निवडून द्यायचा ठेका घेतला आहे का ? जे आपल्या मुलांच्या मुळावर उठतो तो आपला नाही. फक्त आणि फक्त आरक्षण यासाठी यापुढे लढा त्यामुळे घरा घरातल्या मराठा मुलांचा फायदा आहे. 24 डिसेंबर पर्यंत एकजूट ठेवा, आता सरकारची सुट्टी नाही. सरकारचे कान बिघडले नसतील तर त्यांनी वाशी येथील रात्री जमलेला जनसमुदाय पाहावा व आरक्षण द्यायचे की नाही हे ठरवावे. आम्ही पण गनिमी कावे करू आमच्या मनगटाला हात लावू नका, खेटू नका कारण तुमचा विजय होणार नाही.
माझ्याकडे काही नाही, साधे घर आहे. मी मारायला पण भीत नाही, मला काय झाले तर हे समाजाचे आग्या मोहोळ तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे आमच्या नादाला लागु नका, 70 वर्ष दिले नाही ते आरक्षण द्या. मी मराठा समाजासाठी गद्दारी करणार नाही.
धनगर, मुस्लिम आपल्या बाजूने उभे राहिले, बंजारा यांनी पाठिंबा दिला. ब्राह्मण व माळी समाजाने वाशी येथे पाठिंबा दिला आहे आता सगळ्या ओबीसीचा मराठा पाठिंबा आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळेपर्यंत रात्र दिवस कष्ट करा, जीवन जगताना जसे पाणी हवे तसे आरक्षण हवे. मतभेद व राजकारण होऊ देऊ नका, मी सरकारच्या छातीवर बसून आरक्षण घेऊन देतो असे म्हणाले.