धाराशिव – समय सारथी
सरसकट मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला 15 नोव्हेंबर बुधवारपासुन सुरुवात होणार आहे. दिवाळी भाऊबीजच्या दिवशी ते मराठा आरक्षण लढ्याच्या मोहिमेवर निघतील. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात ते 9 जिल्ह्यात 24 गाठी भेटी सभा घेणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी व परंडा या 2 ठिकाणी 15 नोव्हेंबरला सभा होणार असुन त्याची तयारी पुर्ण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्यात मनोज जारांगे पाटील हे 9 जिल्ह्यात 24 सभा घेणार असून त्यासाठी 1 हजार 575 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. सभेसाठी त्यांनी 47 तासाचा वेळ दिला असून त्यासाठी 41 तास प्रवास करावा लागणार आहे मात्र ठीकठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार असल्याने प्रवासाचा वेळ वाढणार आहे.
मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली असून तोपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मुंबई धडक देण्याचा व मुंबईचे नाक बंद करू असा इशारा दिला आहे.
धाराशिव,सोलापूर,सांगली,सातारा,कोल्हापूर,रायगड,पुणे,नाशिक व अहमदनगर या नऊ जिल्ह्यात सभा घेणार आहेत व त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे 23 नोव्हेंबर रोजी जाणार आहेत.