धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पहिला मोळीपुजन सोहळा 14 नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे. तेरणा कारखाना गेली 12 वर्ष बंद होता त्यानंतर तो आता सुरु होत असुन भैरवनाथ समुहाने तो आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतला आहे.
साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी तेरणा कारखान्याच्या मोळीपुजन सोहळा संपन्न होत असुन चेअरमन शिवाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रकाश बोधले महाराज, कार्यकारी संचालक केशव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, धनंजय सावंत यासह मान्यवर उपस्थितीत कार्यक्रम सोहळा होणार आहे.
गेल्या 2 दिवसापुर्वी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. किसनराव समुद्रे यांच्या ऊसाची पहिली ऊसतोड ऊस बैलगाडी वाजत गाजत फटाक्याच्या अतिशबाजीत मिरवणूक काढून कारखाना गेटवर नेण्यात आली. पहिल्या ऊस बैलगाडीची पूजा चेअरमन शिवाजीराव सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे,संग्राम देशमुख,राहुल पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.