पुणे – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांचे पालकत्व स्वीकारले आहे. आरक्षण लढ्यात आत्महत्या केलेल्या 35 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची अशी 1 कोटी 75 लाख रुपयांची मदत दिली असुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह जबाबदारी स्वीकारून पालकत्व घेतले आहे.
मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समुहाच्या मार्फत ही मदत छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सावंत यांनी मराठा तरुणांना आत्महत्या करू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका असे आवाहन केले. आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना मदतीचे चेक देऊन पालकत्व स्वीकारताना मंत्री तानाजीराव सावंत भावनिक झाल्याने अश्रू अनावर झाले.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद घटना आहे. मागील दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहे. मागील वेळी देखील मराठा आरक्षण साठी 58 मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आले यादरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे त्यामुळे संसार उघड्यावर येत आहे. अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलन सुरू झाले असे सावंत म्हणाले.
आरक्षण मिळणार आहे, सरकार त्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे मात्र घरातील दिवा विझल्यावर काय होत, त्या घराचे अस्तित्व टिकत नाही. परिवाराला खुप वेदना होतात त्यामुळे हात जोडून कळकळीची विनंती आहे आत्महत्या करू नका, असे केल्यास मग आरक्षण कोणासाठी ? असे सांगत भावनिक आवाहन केले.
मी मराठा समाजात जन्मलो आहे, त्यासाठी माझं काहीतरी देणं लागत आहे त्यामुळे मी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख मदत देऊन माझं कर्तव्य करीत आहे. फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकले नाही यावर कोणी बोलत नाही, तत्कालीन सरकारला ते का आरक्षण टिकवता आले नाही.पहिले आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणीच काही बोलले नाही.
आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते मिळवणार आहे. आपलं रक्त हे समोरच्याचं नरड्याचे घोट घेण्यासाठी आहे, आत्महत्या करण्यासाठी नाही. न्यायिक मार्गाने आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आपण टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन केले.
यापुर्वी मंत्री सावंत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत, सामूहिक विवाह सोहळे,शैक्षणिक मदत केली आहे. त्यातून त्यांनी सामाजिक जबाबदारी जपली आहे.