धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 57 मंडळाना अग्रीम पीक विमा मिळणार असुन याबाबतचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिले आहेत. विमा कंपनीने याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना दिले आहे. पुर्वी 40 मंडळाना अग्रीम विमा दिला जाणार होता मात्र आता वगळलेल्या उर्वरित 17 मंडळाना अश्या सर्वच्या सर्व 57 मंडळाना मदत मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवत पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत सुरुवात झाली असून उर्वरित मंडळाना सुद्धा दिवाळीपुर्वी लवकरच मदत देण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 17 मंडळाना विमा नाकारला होता मात्र आता मिळणार आहे त्यात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,कळंब तालुक्यातील कळंब,ईटकुर,मोहा, गोविंदपूर,भूम तालुक्यातील भूम,वालवड,अंभी,पाथरुड, माणकेश्वर,आष्टा,परांडा तालुक्यातील आसू,जवळा, पाचपिंपळा,वाशी तालुक्यातील वाशी,तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या मंडळांचा समावेश आहे.
40 महसूल मंडळातील 3 लाख 44 हजार 925 शेतकऱ्यांना 161 कोटी 81 लाख मिळणार होते त्यात आता भर पडली असुन 17 मंडळातील 1 लाख 53 हजार 795 शेतकऱ्यांना 57 कोटी अग्रीम विमा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील 4 लाख 98 हजार 720 शेतकऱ्यांना 218 कोटी 86 लाख मिळणार आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2023 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार 853 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला होता. त्यापैकी 5 लाख 60 हजार 468 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 406 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक संरक्षित केले होते. पावसाचा खंड, कीड व दुष्काळ असल्याने नुकसान भरपाईच्या 25 टक्के पीक पीक विमा मिळण्याची तरतूद असल्याने नुकसान भरपाई द्यावी याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी काढली होती.
धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, अंबेजवळगे, येडशी, ढोकी, जागजी, तेर, बेंबळी, केशेगाव, पाडोळी, करजखेडा, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, मंगरुळ, ईटकळ, तामलवाडी, सावरगाव, जळकोट, सलगरा, आरळी बु., उमरगा तालुक्यातील उमरगा, डाळींब, मुळज, मुरुम, बेडगा, बलसुर, लोहारा तालुक्यातील लोहारा, जवेळी, धानुरी, माकणी, कळंब तालुक्यातील शिराढोण, नायगाव, येरमाळा, मस्सा खु., वाशी तालुक्यातील पारगाव, पारा, भूम तालुक्यातील ईट तर परंडा तालुक्यातील परंडा, सोनारी, शेळगाव, अनाळा अशा ४० महसूल मंडळात सलग २१ दिवस पावसात खंड पडल्यामुळे अग्रीम मिळणार आहे.
उर्वरीत १७ महसूल मंडळात कमी पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पावसातील विचलन आदी बाबींचा विचार करुन सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याकरिता अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. परंतु उर्वरीत १७ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या बाबतीत विमा कंपनीने काहीं हरकती नोंदविल्या होत्या. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी २१ ऑगस्ट, १२ सप्टेंबर व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन विमा कंपनीस अग्रीम देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
हरकतीच्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत सविस्तर खुलासा २५ सप्टेंबर २०२३ रोजी पाठवून विमा कंपनीस पाठवून उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील २५ टक्के आगाऊ रक्कम वितरीत करण्याकरीता विमा कंपनीस आदेशित केले होते. ६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये आयुक्त (कृषि), यांना देखील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्याबरोबरच उर्वरीत १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील अग्रीम रक्कम देण्याकरीता आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरुन विमा कंपनीस आदेशीत करण्याबाबत कळविले होते.
मुख्यमंत्री यांच्या ४ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी विमा कंपनीस जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळातील सर्व सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम दिवाळीपुर्वीच जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कळविले होते. त्यास एचडीएफसी इर्गों या विमा कंपनीने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अग्रीम मिळणार आहे.