अवैध बांधकाम परवाना व 8 अ प्रकरण – केंद्रे यांना कोर्टाने लावली हजेरी
धाराशिव – समय सारथी
नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांना कोर्टाने आगामी 10 दिवस रोज दुपारी 2 ते 5 या वेळेत आंनद नगर पोलिस ठाण्यात हजर राहून तपासात मदत करण्याचे आदेश दिले. केंद्रे यांच्या समोरील अडचणीत वाढ होत असुन त्यांच्यावर अवैध बांधकाम परवाना व 22 मालमत्ताना नियमबाह्य व बेकायदेशीरपणे 8 अ उतारा दिल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार आहे.
धाराशिव नगर परिषद हद्दीमध्ये पोलिस मुख्यालया समोरील सर्व्हे नंबर 145/5 मध्ये छत्रपती हौसिंग सोसायटीमधील मंजुर रेखाकनातील प्रसाद रंगनाथ पाटील व पुजा प्रसाद पाटील हे खुल्या जागेत आणि अंतर्गत रस्त्यावर बांधकाम करीत असल्याची तक्रार उदय निंबाळकर यांनी केली होती त्यात बांधकाम परवान्याची संचिका उपलब्ध नसल्याचे प्रथम नगर परिषदेने कळविले मात्र नंतर पाटील यांना पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी परवाना सादर केला.संचिका सापडत नसल्याचा लेखी अहवाल मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला त्यानंतर तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यावर कलम 420, 465,484 अन्वये गुन्हा नोंद झाला होता.
केंद्रे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी प्रसाद व पुजा पाटील बांधकाम प्रकरणात परवाना दिल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे त्यामुळे त्यात पण केंद्रे यांना आरोपी करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्रे यांची जानेवारी 2020 मध्ये बदली झालेली असतानाही जुलै 2020 मध्ये पाटील यांना केंद्रे यांनी बांधकाम परवाना दिल्याचा आरोप केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केंद्रे यांना लेखी नोटीस काढली आहे. केंद्रे यांनी यलगट्टे यांच्या सोबत संगणमत करुन बेकायदेशीर परवानगी दिली असे नोटीसमध्ये नमूद असून 7 दिवसात खुलासा करावा असे आदेशीत केले आहे.
केंद्रे हे आता रडारवर आल्याने आगामी काळात यलगट्टे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रे यांच्याकडून अनेक बाबींचा खुलासा झाल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.
22 मालमत्ता यांना 8 अ दिल्याचे प्रकरण –
धाराशिव शहरातील 22 मालमत्ताना नियमबाह्य व बेकायदेशीरपणे 8 अ उतारा दिल्याप्रकरणी तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांना सहआरोपी करावे असे लेखी पत्र मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पोलिसांना दिले होते. नगर परिषदेच्या हद्दीतील 365/5 मध्ये अनधिकृतपणे पाडण्यात आलेल्या 22 भूखंडाची नोंद 8 ला घेल्याचे प्रकरणी चौकशी सुरु होताच संचिका गायब करण्यात आली होती त्या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह लिपीक राजेंद्रकुमार शिंदे यांच्यावर कलम 197,471,477 अ, 201 प्रमाणे 5 मार्च 23 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातही केंद्रे यांची भुमिका संशयास्पद आहे.
22 भूखंडाची नोंद घेताना संबंधित नगर अभियंता नवनाथ केंद्रे व लिपीक राजेंद्रकुमार शिंदे यांनी बेटरमेंट व विकास कर शुल्क भरून घेतले नाही तसेच हे प्लॉट आरक्षित होते त्यामुळे नगर परिषदेचे नुकसान झाले. या प्रकरणी गुन्हा नोंद करावा व रक्कम वसुली करावी असा ठराव 21 डिसेंबर 2020 रोजी विशेष सभेत घेण्यात आला होता त्या अनुषंगाने केंद्रे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती मात्र त्यांनी खुलासा दिला नाही.