धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी असल्याचे आणखी पुरावे व कागदपत्रे सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 642 पैकी तब्बल 181 गावात मराठा कुणबी असल्याची नोंद सापडली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. 181 गावात मराठे हे कुणबी असल्याचे समोर आले आहे, या गावांची नावे व सापडलेले पुरावे, नागरिकांची नावे येत्या 3-4 दिवसात शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जातील त्यानंतर त्यांनी वंशावळ व इतर कागदपत्रे दिल्यास प्रमाणपत्र मिळणार आहे.
181 गावात 726 ठिकाणी घरांच्या व जनगणनेच्या नोंदीत मराठा कुणबी अशी नोंद सापडली आहे. यापूर्वी जवळपास 40 लाख कागदपत्रे प्रशासनाने तपासली होती त्यात 459 नोंदी सापडल्यानंतर आता नव्याने 726 नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आकडा हा 1 हजार 185 झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 22 गावात 122, तुळजापूर तालुक्यातील 35 गावात सर्वाधिक 315, परंडा 28 गावात 78, भुम 37 गावात 56, कळंब 39 गावात 135, वाशी 17 गावात 21 ठिकाणी अश्या 726 ठिकाणी नमुना नंबर 33 व 34 मध्ये मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख संग्राम जोगदंड यांच्यासह त्यांची टीम व उर्दू, मोडी लिपी भाषातर करणारे तज्ञ यांची समिती युद्धपातळीवर काम करीत आहे. रेकॉर्ड शोधण्याचे काम अजुन सुरु आहे.
ज्या 459 जणांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यातील पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कॅम्प लावले गेले आहेत. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या अहवालानंतर व राज्य सरकारच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील कारी येथील सुमित माने या तरुणाला पहिले मराठा कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, निवासी जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार प्रवीण पांडे, शिवानंद बिडवे यांच्या हस्ते देण्यात आले. आजवर धाराशिव जिल्ह्यातील 64 पात्र लाभार्थी यांना मराठा कुणबी प्रमाणपत्र दिले आहे.
भुमी अभिलेख कार्यालयात असलेल्या नमुना नंबर 33 मध्ये घराचे बांधकाम प्रकार, मालक नाव व जातीची नोंद असते तर नमुना 34 मध्ये घरातीलकर्ता पुरुष, त्यांची 15 वर्षाच्या पुढील मुले, जनावरे,साक्षरता, स्थावर मालमत्ता अश्या जनगणना नोंदी आहेत, या नोंदी घ्या 1880 च्या काळातील आहेत.
पुर्वी निजाम काळात नळदुर्ग हा जिल्हा होता त्यानंतर धाराशिव हा जिल्हा अस्तित्वात आला व नंतर धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा जिल्हा तयार झाला तर धाराशिव जिल्ह्यात काही गावे ही सोलापूर जिल्ह्यातून आली आहेत त्यामुळे आता पूर्वीचा नळदुर्ग, धाराशिव, लातूर व सोलापूर या 4 ठिकाणचे निजामकालीन व इंग्रजकालीन रेकॉर्ड शोधले जाणार आहे.
भुमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असलेली 7 लाख 62 हजार 182 कागदपत्रे तपासण्यात आली त्यात 726 कुणबी पुरावे सापडले. भुमी अभिलेख कार्यालय धाराशिव येथे 1 लाख 18 हजार 715, तुळजापूर येथे 1लाख 33 हजार 415, उमरगा 93 हजार 8, लोहारा 54 हजार 414, भुम 1 लाख 9 हजार 735, परंडा 85 हजार 324, कळंब 1 लाख 3 हजार 161 व वाशी तालुक्यात 64 हजार 410 कागदपत्रे तपासली असुन अजुन 2-3 दिवस मोहीम चालणार आहे. लोहारा तालुक्यात एकही नवीन पुरावा सापडला नाही.