चौकशी पुर्ण, कारवाईकडे लक्ष – धाराशिव नगर परिषदेच्या चौकशी अहवालात दडलंय काय ?
यलगट्टे यांचे कल्याण होणार की पुन्हा जेलवारी ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील विविध योजनांची चौकशी पुर्ण झाली असुन चौकशी समिती स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करू शकते. चौकशी अहवालात दडलंय काय ? यांची आता चर्चा होत आहे. चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. योजनाचा निधी परस्पर नियमबाह्य पद्धतीने वर्ग करुन खर्च करणे, काही व्हाऊचर महत्वाची कागदपत्रे गहाळ असणेसह प्रचलीत कार्यपद्धती व नियमांचा भंग केल्याची प्राथमिक माहिती आहे.
कधी कागदपत्र गहाळ तर कधी ती शोधण्याची धावपळ, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या 2 वेळेस आठवडी सुट्टया रद्द करणे यासह चौकशी समितीला कागदपत्रे मिळावीत यासाठी तब्बल 7 वेळा लेखी स्मरणपत्रे अश्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर चौकशी पुर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना स्वतः या प्रकरणात अनेक वेळा दट्टा लावावा लागला हे विशेष.
चौकशीतील कार्यकाळ हा विविध घोटाळा व गुन्हे नोंद असलेले तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा आहे. या अंतिम अहवालअंती यलगट्टे यांच कल्याण होणार की पुन्हा एकदा गुन्हे नोंद होऊन जेलवारी होणार ? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. चौकशी अहवालाची धास्ती काही जणांनी घेतली आहे.
महाराष्ट्र लेखासंहिता 2011 नियम क्र 62,315,317, 450 मध्ये अनुदान प्राप्त नोंदवही नमुना क्र 26 चा 7 जुलै 2020 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील नमुना, नगर परिषद यांना लागू असलेल्या सर्व योजनाच्या बँक खात्याची यादी व बँक विवरणपत्र, सर्व योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांच्या संचिका व प्रमाणके, बँक ताळमेळ विवरणपत्र, सर्वसाधारण बँक पुस्तक नुमना व बँक खातेनिहाय नोंदवही या चौकशीत तपासण्यात आल्या, त्यानुसार अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या काळात महानगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहर मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 व इतर योजनाचे ठेकेदार यांना देण्यात आलेले धनादेश (चेक) बँकेमध्ये न वटता परत आले तसेच विविध योजने अंतर्गत नगर परिषदेस प्राप्त झालेले अनुदान हे योजनेत समाविष्ट कामावर खर्च न करता इतर कामावर खर्च करण्यात आले.
धाराशिव नगर परिषदेचे विविध बँकात 39 खाते असल्याची माहिती यलगट्टे यांनी दिली मात्र उमरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केलेल्या तपासणीत धाराशिव नगर परिषदेची 121 खाती असल्याचे उघड झाले यावरून एकच योजनेचे एकपेक्षा जास्त खाती उघडल्याची शक्यता नाकारता येत नाही असा निष्कर्ष समोर आला आणि त्यानंतरच जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले. नगरोत्थान योजना सुद्धा चौकशीच्या रडारवर आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती त्यात सदस्य म्हणून उमरगा नगर परिषदेचे लेखापाल अंकुश माने, भूमचे लेखापाल विवेकानंद बिराजदार, कळंबचे हिंदुराव जगताप, लोहाऱ्याचे दीपक मुंडे व वाशीचे भागवत पवार यांचा समावेश होता. या समितीने चौकशी करुन दोषी असल्यास जबाबदारी निश्चित करुन कारवाईच्या शिफारशीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
10 एप्रिल पासुन चौकशी सुरु करुन 7 दिवसात चौकशी संपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. चौकशी पुर्ण झाली असुन अहवाल तयार केला आहे मात्र शुक्रवार, शनिवार व रविवार अश्या 3 दिवस सलग सुट्टया असल्याने सोमवारी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाऊ शकतो.