अरविंद पतसंस्था घोटाळ्यात 2 नोव्हेंबरला सुनावणी – निर्णयाकडे गुंतवणुकदारांचे लक्ष, 3 कोटी 50 लाखांची फसवणुक
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँकेचे चेअरमन तथा घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आरोपी विजय नाना दंडनाईक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज धाराशिव येथील कोर्टाने फेटाळला आहे. न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी हा जामीन नाकारला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून विजयकुमार दंडनाईक हे फरार असुन आता त्यांचा जामीन नाकारला आहे त्यामुळे पोलिस त्यांना आता तरी अटक करणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे. वसंतदादा बँकेचे सर्व संचालक, व्यवस्थापक फरार आहेत.
वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. या घोटाळ्यात दंडनाईक यांचा संचालक मुलगा पृथ्वीराज,पत्नी सुरेखा असे कुटुंब अडकले असुन त्यांचा जामीन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला असुन तेही सध्या फरार आहेत तर पोलिस त्यांच्या कायम तपासावर व मागावर आहेत.
अरविंद पतसंस्था ही दंडनाईक परिवाराची असुन त्याही बँकेत घोटाळ्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. चेअरमन रोहित दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा नोंद आहे. 10 लाखांचा प्राथमिक गुन्हा नोंद असुन त्यातील 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली आहे मात्र तपासात घोटाळ्याचा आकडा हा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.
गुन्हा नोंद केलेल्या तक्रारदार वाकुरे यांनी यापुर्वी रोहितराज दंडनाईक यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. त्यामुळे एकाच फसवणूकीच्या गुन्ह्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंद होऊ शकत नाहीत त्यामुळे गुन्हा रद्द करावा अशी भुमिका आरोपीचे वकील ऍड मिलींद पाटील यांनी मांडली आहे तर तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या आजवरच्या तपासात फसवणूकीचा आकडा साडे तीन कोटी कोटीच्या पुढे गेला आहे शिवाय मूळ एफआयआर गुन्ह्यात वाकुरे सोडून अन्य लोकांची तक्रारदार म्हणून नावे आहेत तर चौकशीत अनेक नवीन तक्रारदार समोर आले असुन त्यातील काहीनी कोर्टात शपथपत्र व वकीलपत्र दाखल केले आहे. प्रत्येकाने वेगळा गुन्हा व कोर्टात जायचे का ? अशी बाजु गुंतवणूकदार यांचे वकील ऍड अजित खोत यांनी मांडली आहे. सरकारी वकील शरद जाधवर यात काम पाहत आहेत.
एकंदरीत अनेक कायदेशीर तांत्रिक मुद्दे व 3 कोटी 50 कोटी फसवणूक आकडा यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे. वसंतदादा व अरविंद या दोन्ही प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश बागे पाटील यांच्या कोर्टात होत आहे. अरविंद पतसंस्था प्रकरणात 2 नोव्हेंबर रोजी कोर्टात सुनावणी असुन अटकपूर्व जामीनावर अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यात 28 जुलै 23 रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तर अरविंद पतसंस्था घोटाळ्यात 1 सप्टेंबर 23 रोजी गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. कलम 420,409,34 सहमहाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हे वसंतदादा बँकेचे संचालक फरार
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे फरार आहेत.