रेल्वे रोको धाराशिव येथे, परंडा बंदची हाक तर तुळजापुरात शासकीय कार्यालयाना टाळे ठोकले जाणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असुन विद्यमान मंत्री, खासदार आमदार यांच्या घरांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. धाराशिव येथे आज रेल्वे रोको करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी परंडा बंदची हाक देण्यात आली आहे तर तुळजापुरात शासकीय कार्यालयाना टाळे ठोकण्याचा इशारा देत रास्ता रोको केला जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात आजपासुन पुढील आदेशापर्यंत म्हणजे स्तिथी सामान्य होईपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने काढले 144 चे आदेश काढले असुन 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
धाराशिव जिल्ह्यात विविध भागात धरणे आंदोलन, रास्ता रोको, उपोषण चालु असुन उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे आंदोलकांनी कर्नाटक राज्य महामार्गाची बस पेटवून दिली आहे. आज धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको,रेल रोको,बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असल्यामुळे ठीकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संचार बंदीचे आदेश काढले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार धाराशिव जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत लागू केली आहे. सदर संचारबंदीही शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, दुकाने व आस्थापना यांना लागू असणार आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये संचारबंदी काळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र,ज्वलनशील पदार्थ,स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.
सदरील संचारबंदीमध्ये शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय दूध वितरण, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, सर्व बँका, दूरध्वनी इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या संस्था, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, दवाखाने औषधी दुकाने, रुग्णवाहिका, विद्युत पुरवठा ऑइल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यम व मीडिया, अत्यावश्यक सेवा, अंत्यविधी व अंत्ययात्रा यांना सूट असणार आहे.
धसका मराठा आंदोलकांचा – मंत्री, खासदार व आमदार यांच्या घरांना पोलिस संरक्षण
धाराशिव जिल्यात सुरु असलेल्या आक्रमक मराठा अंदोलनाची दहशत पसरली असुन त्याचा धसका प्रशासनाने घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या घरांना पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असुन 4 आमदार व 1 खासदार यांच्या घरांना आजपासुन पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत, धाराशिव कळंबचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, उमरगा लोहाराचे शिवसेना शिंदे गट आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या घरांना पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली असुन आक्रमक मराठा आंदोलन पार्शवभुमीवर पोलिस संरक्षणचा निर्णय घेण्यात आला आहे.