धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलन सुरु असुन त्याचाच एक भाग म्हणून नेत्यांना गावबंदी केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक गावांनी गावबंदी केली असली तरी जे लोकप्रतिनिधी नेते त्या गावात राहतात किंवा त्या गावाचे प्रतिनिधित्व करतात त्या गावात मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. 3 नेत्यांची गावे वगळता इतर ठिकाणी गावबंदी करण्यात आलेली नाही.
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या परंडा तालुक्यातील मुगाव गावाने ठराव घेऊन सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे. माजी आमदार सुजितसिंह ठाकुर व ज्ञानेश्वर पाटील हे परंडा शहरातील असुन तिथे शहरबंदी करण्यात आली आहे तर उमरगा येथील आमदार यांच्या उमरगा येथे शहर बंदी नसुन आंदोलनस्थळी नेत्यांना येण्यास बंदी आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तेर,आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा,शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या पळसप,पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या भातागळी,आमदार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मुरूम,माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या आष्टा,माजी आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली या गावात नेत्यांना गावबंदी केली नाही. काही ठिकाणी बैठका होऊन गावबंदी बाबत एकमत झाले आहे मात्र अजुन घोषणा किंवा गावबंदीचे बोर्ड लावले गेले नाहीत.
काही लोकप्रतिनिधी गावात राहत असल्याने किंवा त्यांचा रोजचा संपर्क गावात असल्याने त्यांना गावबंदी करणे योग्य ठरणार नाही मात्र गावात राहणारे स्थानिक लोकप्रतिनिधी व नेते वगळता इतर नेत्यांना आम्ही गावबंदी करणार असल्याचे संबंधित ग्रामस्थानी सांगितले.
मराठा आरक्षण नसल्याने शिक्षण व नौकरी नाही,आमची अनेक मुले गाव घर सोडून मोठ्या शहरात रोजगारासाठी गेली. नेत्यांना त्यांच्याच गावात बंदी केली की गाव घर सोडण्याचे दुःख तरी कळेल, इतके दिवस त्यांनी मराठा आरक्षणबाबत काय केले ? अशी संतप्त प्रतिक्रिया काही गावकऱ्यांनी दिली.
गावात राहणाऱ्या स्थानिक नेत्यांना गावबंदी बाबत संभ्रम व वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झाला असुन सर्वपक्षीय राजकीय नेते, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. मराठा आता रस्त्यावर उतरला असुन 200 पेक्षा अधिक गावात आजी माजी मंत्री, खासदार,आमदार यांना गावबंदी केली असुन हिम्मत असेल तर गावात येऊनच दाखवा असा सज्जड दम दिला आहे. चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष यासह बस झाले नेत्यासाठी आता फक्त जातीसाठी या घोषणा देत समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाज आक्रमक झाला असुन काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घातला असुन राजकीय पदांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा देण्यात आले आहेत. आरक्षणाला विरोध करणारे व आरक्षण न देणाऱ्या नेत्याचे सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर काही ग्रामपंचायत व इतर कार्यालयात भिंतीवर लावलेले सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो उतरवले गेले तर मंत्री यांच्या अंगावर शाईफेकीचा इशारा देण्यात आला आहे तर धाराशिव शहरासह अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरु केले आहे.