नवा गडी, नवा राज – मोळी टाकायच्या कार्यक्रमात भाव जाहीर होणार
धाराशिव – समय सारथी
ढोकी येथील तेरणा कारखान्याचा बॉयलर प्रदिपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शेतकऱ्यांसाठी दसरा व दिवाळी असा दुहेरी सुवर्णयोग आज अनुभवायला मिळाला. तेरणा सुरु झाल्याने आता नवा गडी, नवा राज सुरु झाल्याने आता तेरणा भागातील अर्थकारण बदलणार आहे. तेरणेचे भंगार झालेल्या जुन्या इतिहासाला अनेकांनी उजाळा देत गतवैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोळी टाकायच्या कार्यक्रमाला मंत्री डॉ तानाजीराव सावंत भाव जाहीर करीत असे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांनी सांगितले. राजकारण तेरणा गेटच्या बाहेर ठेवा असे त्यांनी सर्वांना आवाहन केले. तेरणा भागातील इतर कारखान्याच्या तुलनेत अधिक भाव द्यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.
तेरणा कारखाना सुरु असताना 12 कोटी उसाचे पेमेंट भैरवनाथ कारखान्याने दिले मात्र ते अजुन आले नाही, माझ्यावर केस झाल्या. कारखाना काढणे सोपे आहे मात्र चालवणे व टीकवणे अवघड आहे. राजकारण गेट बाहेर ठेवावे, शेतकरी कल्याण, माणुसकी हाच पक्ष माना असे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत म्हणाले.
इतर कारखाने यांनी भाव जाहीर केला,तेरणा कारखान्याचा आता बॉयलर सुरु झाला आहे. शेतकरी यांच्यावर अन्याय होणार नाही, मोळी पुजन बाकी आहे त्यामुळे उसाला योग्य भाव देऊ असे सावंत म्हणाले.
पुढच्या पिढीचे भवितव्य व्हावे यासाठी शेतकरी यांनी जमिनी दिल्या त्यामुळे कारखाना उभा राहू शकला. तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना उभा केला, कामगार यांच्यासाठी घरे बांधली, शाळा बांधला त्यामुळे त्यांचे आभार मानले. कारखाना राजकारण करण्याचे ठिकाण नाही मात्र ज्या दिवशी पासुन कारखानामध्ये राजकारण व हेवेदावे सुरु झाले त्यामुळे कारखाना बंद पडला. संचालक झाले की प्रत्येकाने वाटून घ्यायचा उद्योग केला, रक्षण न करता कारखाना लुटला तसे नसते केले तर आजही कारखाना सुरु राहिला असता असे सावंत म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाने आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतला असुन तब्बल एका तपानंतर म्हणजे 12 वर्षानंतर बॉयलर पेटला असुन लवकरच मोळी टाकण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे.
भैरवनाथ साखर समूहाचे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत, व्हॉइस चेअरमन अनिल सावंत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत, गिरीराज व ऋषीराज सावंत यासह सावंत परिवारातील सदस्य यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदिन करण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच अमोल पापा समुद्रे,जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोनसे पाटील, बाळासाहेब शिंदे, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, तालुका अध्यक्ष अजित लाकाळ, ऍड अजित खोत, संग्राम देशमुख, अजित पिंगळे,राहुल वाकुरे, निहाल काझी यासह शेतकरी, सभासद, तेरणा कारखाना बचाव समिती व नागरिक उपस्थितीत होते.
भैरवनाथ शुगर वर्क्सचे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हे 6 वे युनिट आहे. दररोज 6 हजार 500 मेट्रिक टन गाळप क्षमता,50 केएलपीडी डिसलरी,14 मेगावॉट वीज निर्मिती होणार असुन यामुळे 1 हजार कामगारांना रोजगार मिळणार आहे.
तेरणा कारखान्यावर माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजीतसिंह पाटील परिवाराची एकहाती सत्ता होती त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे डबघाईला आलेला व कर्जबाजारी झालेल्या तेरणा साखर कारखान्याची सत्ता आली मात्र त्यांना तो चालवता आला नाही व तेरणा बंद पडला. हजारो कामगार यांचे रोजगार गेल्याने ते बेघर झाले तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.