15 हजारांची लाच घेताना एकास अटक – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई, रेट कार्डची प्रथा
धाराशिव – समय सारथी
जमिनीची मोजणी करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करुन 15 हजार रुपये लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील एकास धाराशिव लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. अकृषी जमिनीची मोजणी करण्यासाठी ही लाच स्वीकारली आहे. यापूर्वी अकृषी करण्यासाठी नगररचनाकार कार्यालयात लाखोंची लाच घेताना एकास अटक केली होती.सुनील श्रीराम रामदासी,परिरक्षण भुमापक ( निमतानदार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अकृषीसाठी जणू धाराशिव जिल्ह्यात भूमी अभिलेख, नगर रचनाकार, नगर परिषद व महसूल विभागात एकरी रेटकार्डच आकारले जात आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी 6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. अकृषीसाठी जणू काही काही कार्यालयात लाचेचे एकरी रेटकार्ड ठरले आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दाखल करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चलन भरलेले होते तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडी मोजणी करून देण्यासाठी यातील आलोसे सुनील श्रीराम रामदासी, वय 55 वर्षे, परिरक्षण भुमापाक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय, वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी रामदासी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी जबाबदारी पार पाडली. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमूगले, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पहिले.